सरत्या वर्षात क्रीडा विकास थांबला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:07+5:302020-12-31T04:31:07+5:30
प्रवीण गडदे उस्मानाबाद : क्रीडा जगतात उस्मानाबाद जिल्ह्याने वेगळी छाप टाकली आहे. नेहमीच क्रीडा क्षेत्रात चढता आलेख असणाऱ्या उस्मानाबाद ...
प्रवीण गडदे
उस्मानाबाद : क्रीडा जगतात उस्मानाबाद जिल्ह्याने वेगळी छाप टाकली आहे. नेहमीच क्रीडा क्षेत्रात चढता आलेख असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध घडामोडींना सरत्या वर्षात कोरोनाने ब्रेक लावला. प्रत्येकाच्या स्मरणात राहणाऱ्या २०२० वर्षात खेळाडूंचा सराव थांबला. मैदाने ओस पडली. परिणामी, जिल्ह्यातील क्रीडा विकास थांबला. मात्र, आलेल्या परिस्थितीशी तोंड देत खेळाडू त्यांना घडविणारे प्रशिक्षक व मैदाने पुन्हा एका नव्या उमेदीने आपल्या कौशल्यासह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. विशेष म्हणजे, याच वर्षात आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सारिका काळे यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संघटना, शालेय व विद्यापीठस्तरावर तालुकास्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा होत असतात. वर्षभर मैदानावर घाम गाळून खेळाडू स्पर्धेत आपले कौशल्य आजमावत स्पर्धा जिंकण्यासाठी धडपडत असतो. त्याच्यासाठी त्याचे प्रशिक्षक विशेष मेहनत घेत असतात. परंतु, सरत्या वर्षात कोरोनामुळे या सर्वांवर पाणी फेरले. परिणामी स्पर्धा, खेळाडूंचा सराव थांबला. परंतु, आलेल्या परिस्थितीशी न डगमगता घरातील अंगण, टेरेस आदींचा आधार घेत खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला. याबाबतीत प्रशिक्षकही मागे राहिले नाहीत. त्यांच्याकडूनही ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले गेले. विशेष म्हणजे, विविध क्रीडा संघटनांकडून या काळात खेळाडू व प्रशिक्षकांसाठी ग्राऊंड सेटअप, स्किल फॉर बिगगिनर्स, ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट, नवीन नियमावली, क्रीडा प्रकारानुसार व्यायाम, माईंड कोचिंग, स्पोर्ट्स इंज्युरी अँड रिहॅबिलेशन, न्यूट्रिशन अँड डायट, खेळातील जैवतंत्रज्ञान, वेट लॉस, मानसशास्त्रीय पैलू आदींसह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाईन शिबिरे घेतल्यामुळे त्यांच्या बौद्धिक वाढीस मदत मिळाली आहे. यंदा मात्र कोणतीच स्पर्धा आयोजिली जाणार नसल्यामुळे खेळाडूंचा हिरमोड झाला आहे. परंतु लॉकडाऊननंतर खेळाडूंनी नव्या जिद्दीने, नव्या जोमाने सरावास सुरुवात करीत आपली लय राखली असून आगामी स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आगामी स्पर्धेत पूर्वीची चमकदार कामगिरी दाखवत स्पर्धेवर पुन्हा वर्चस्व ठेवण्याची धडपड असणार आहे. शालेय स्पर्धेत ७२, विद्यापीठस्तरावर ३५ तर संघटनेमार्फत जवळपास १०० क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेतल्या जातात. परंतु, या सर्व स्पर्धांना कोरोनामुळे ब्रेक लावला गेला. नेहमी गजबजणारे मैदाने ओस पडली. एकंदरीत कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राची फार मोठी हानी झाली असून २०२० हे वर्ष सर्वांच्या स्मरणात नेहमीच राहील.
शारीरिक तंदुरुस्ती : जागरूकता वाढली
चुकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक तंदुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्षित केले जायचे. परंतु, लॉकडाऊन कालावधीत याबाबतीत जागरूकता वाढली असून, या कालावधीत नागरिकांकडून योग, प्राणायाम व व्यायाम करत तंदुरुस्ती ठेवण्यावर भर दिला आहे.
रस्ते बनले वॉकिंग कम जॉगिंग ट्रॅक
संचारबंदी कालावधीत मैदाने बंद असल्यामुळे अनेकांनी वॉकिंग व जॉगिंगसाठी विविध भागांतील रस्त्यांचा आधार घेतला. परंतु, अनेकांना पोलिसांचा दंडुकाही खावा लागल्यामुळे अनेकांना हे वर्ष चांगलेच आठवणीत राहिले.
सायकलची क्रेज वाढली
कोरोनामुळे आरोग्याची जागरूकता वाढली असून, सकाळच्या कालावधीत व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालण्यासह धावण्याबरोबरच बहुतांशाचा कल सायकलिंगकडे वाढला असून, उस्मानाबाद सायकलिंग संस्कृती रुजली आहे.
ऑनलाईन स्पर्धेतही खेळाडूंची चमकदार कामगिरी
शालेय, विद्यापीठ व संघटनेच्या स्पर्धा प्रत्यक्षात मात्र मैदानावर झाल्या नसल्या तरी योगा, आर्चरी, बुद्धिबळ यासारख्या काही क्रीडा संघटनांनी ऑनलाईन क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामुळे खेळाडूंच्या कौशल्याला चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन नंतर अनेक क्रीडा प्रकारांतील स्पर्धा खुल्या रूपाने होणार असल्याने खेळाडूंचा जोश पुन्हा पहावयास मिळणार आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारावर राहिले कोरोनाचे सावट
क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरीत करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व दिव्यांग खेळाडूंना जिल्हा स्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. परंतु, कोरोनामुळे यंदाचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे.
सारिकाची अर्जुनभरारी
विविध क्रीडा पुरस्कारांनी खेळाडू, संघटक, मार्गदर्शक सन्मानित केले जात आहेत. क्रीडा जगतातील सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्काराने आंतरराष्ट्रीय खो खो पटू सारिका काळेला केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाने ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले. विशेष म्हणजे, कोरोना कालावधीत सारिकाच्यारूपाने जिल्ह्यास पुरस्कारात सातत्य ठेवता आले. सारिकाला मिळालेला अर्जुन पुरस्कार खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे.