SSC Result 2019: 'त्याने' मिळवले सर्वच विषयात मिळाले ३५ गुण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 07:08 PM2019-06-08T19:08:33+5:302019-06-08T19:09:14+5:30
शाळा व शेतीचा मेळ बसवीत मिळेल त्या वेळेत त्याने झेपेल तितका अभ्यास केला.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : एकिकडे १०० टक्के गुण मिळविण्याची रस्सीखेच सुरु असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील आपसिंग्याच्या एका विद्यार्थ्याने सर्वच विषयात बरोबर ३५ गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा ‘पराक्रम’ केला आहे. विशेष म्हणजे त्याने उमेद न हरता बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून दाखविण्याचा आत्मविश्वास बोलून दाखविला.
रोहित रोहिदास सोनवणे, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ त्याने तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयातून दहावीची परिक्षा दिली होती. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात रोहितला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र अशा सर्वच विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. त्याच्या या हटके यशाची जिल्ह्याभरात चर्चा आहे.
तुळजापूर तालुक्यातील कांद्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या आपसिंगा गावातील रोहितचे वडील रोहिदास सोनवणे हे व त्यांच्या पत्नी शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितात. रोहितचा एक भाऊ आठवीत तर बहीण सहावीचे शिक्षण घेत आहे़ रोहितचे आई-वडील हे दहावीपर्यंतही शिक्षण घेऊ शकले नाही़ त्यामुळे मुलांच्या शिक्षणाप्रती ते जागरुक आहेत. असे असले तरी घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व भावंडातील सर्वात मोठा असल्याने रोहित हा आई-वडिलांना शेती कामात मदत करायचा.
शाळा व शेतीचा मेळ बसवीत मिळेल त्या वेळेत त्याने झेपेल तितका अभ्यास केला. दहावीची परिक्षा दिल्यानंतर त्याला स्वत:ला यशाची खात्री होती. आई-वडिलांना मात्र, चांगल्या गुणांची अपेक्षा होती. निकालानंतर रोहितचे आई-वडिल काहिसे नाराज दिसले. मात्र, जिल्हाभर झालेल्या चर्चेनंतर व रोहितने त्यांना पुढील शिक्षणात कमी न पडण्याचा शब्द दिल्यानंतर मात्र, त्याची त्यांची कळी खुलली.
मी आता बारावीचा विचार करतोय : रोहित सोनवणे
दहावीला कमी टक्केवारी पडली असली तरी याचा विचार मी करीत नाही. पुढे बारावीत जास्तीत-जास्त गुण संपादन करण्याचा मानस आहे. वडिलांना शेतीत मदत करीत जमेल व झेपेल तेवढा अभ्यास करून मी परीक्षा दिली होती.कमी टक्केवारी पडल्याचा विचार न करता नव्या उमेदीने पुढील शिक्षणाचा विचार करीत असल्याची प्रतिक्रिया रोहितने ‘लोकमत’शी बोलताना दिली.