कोरोनाकाळातील प्राेत्साहन भत्त्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:14+5:302021-03-16T04:32:14+5:30
जिल्ह्यात रोजगार व व्यवसायानिमित्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू राज्यातील नागरिक वास्तव्यास होते. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने उद्योग, ...
जिल्ह्यात रोजगार व व्यवसायानिमित्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू राज्यातील नागरिक वास्तव्यास होते. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने उद्योग, व्यवसाय बंद होते. शिवाय, वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती. परिणामी, परराज्यातील हजारो मजूर जिल्ह्यात अडकून पडले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर या कामगारांना गावी सोडण्यासाठी प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सोय केली. जिल्ह्यातील १६३ बसफेऱ्या झाल्या. या बसवर १६३ वाहक व १६३ चालकांनी ड्युटी बजावली होती. कोरोनाकाळात महानगरपालिका क्षेत्रात ड्युटी बजावणाऱ्या तसेच परराज्यात मजुरांना सोडणाऱ्या वाहक-चालकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता १० महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. भत्ता कधी मिळतो याची प्रतीक्षा वाहक-चालकांना आहे.
१६३
कोरोनाकाळात आपल्या जिल्ह्यातून परराज्यात एसटीच्या फेऱ्या झाल्या
१६३
चालकांनी दिली
कोरोनाकाळात सेवा
१६३
वाहकांनी दिली कोरोनाकाळात सेवा
५ कर्मचारी पॉझिटिव्ह
राज्य परिवहन महामंडळाच्या बस कोरोनाकाळातही प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. सप्टेंबर महिन्यापासून बससेवा रुळावर आली आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण आढळून येतच आहेत, प्रत्येक वाहक-चालकांचा दररोज ५०० प्रवाशांचा संपर्क येत असतो. अद्यापपर्यंत ५ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
कोट...
कोरोनाकाळात जिल्ह्यातील वाहक-चालकांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील मजुरांना राज्यात तसेच सीमेपर्यंत पोहोचते केले आहे. तसेच इतर राज्यांतील मजुरांना रेल्वेने आपल्या गावी परत जाण्यासाठी सोलापूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या बसवर ड्युटी बजावलेल्या चालक-वाहकांना ३०० रुपये निर्वाह भत्ता मिळणे गरजेचे आहे. याबाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्याचा लाभ उस्मानाबाद जिल्ह्यातील वाहक-चालकांना अद्याप मिळालेला नाही.
- शरद राऊत, जिल्हा सचिव, एसटी कामगार संघटना
महानगरपालिका क्षेत्रात बसवर ड्युटी बजावणाऱ्या वाहक-चालकांना ३०० रुपये प्राेत्साहन भत्ता देण्याची शासनाने घोषणा केली होती. जिल्ह्यातील १६३ वाहक व १६३ चालकांनी परराज्यात मजुरांना सोडले आहे. या वाहक-चालकांच्या निर्वाह भत्त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- अश्वजीत जानराव, प्रभारी विभाग नियंत्रक