माल वाहतुकीतून ‘एसटी’ने केली दीड कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:22+5:302021-04-25T04:32:22+5:30

उस्मानाबाद : कोरोना काळात एसटी प्रवासी वाहतुकीला फटका बसत आहे. त्यामुळे ‘एसटी’ महामंडळाला होणारा तोटा कमी करण्यासाठी ‘एसटी’ने मालवाहतूक ...

ST earns Rs 1.5 crore from freight | माल वाहतुकीतून ‘एसटी’ने केली दीड कोटींची कमाई

माल वाहतुकीतून ‘एसटी’ने केली दीड कोटींची कमाई

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोना काळात एसटी प्रवासी वाहतुकीला फटका बसत आहे. त्यामुळे ‘एसटी’ महामंडळाला होणारा तोटा कमी करण्यासाठी ‘एसटी’ने मालवाहतूक सुरू केली आहे. गेल्या दहा महिन्यांत मालवाहतुकीतून एसटी महामंडळाने १ कोटी ५६ लाख रुपयांची कमाई केली आहे.

गतवर्षी २३ मार्चपासून कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी लाॅकडाऊन‌ लागू करण्यात आला होता. या काळात एसटीची तब्बल दोन महिने प्रवासी वाहतूक सेवा ठप्प होती. परिणामी एसटीचे उत्पन्न थांबलेले होते. उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने जून महिन्यापासून मालवाहतूक सेवेला सुरुवात केली. उस्मानाबाद विभागाकडे सुरुवातीला पाच ट्रक होते. शेतकरी, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता ट्रकची संख्या वाढवून ४२ करण्यात आली. जून २०२० ते मार्च २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीत माल वाहतुकीच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला १ कोटी ५६ लाख ३९ हजार ४०८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे कोरोना काळात होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागला आहे.

चौकट...

कशाची होते वाहतूक

ट्रकमधून जिल्ह्यात; तसेच जिल्ह्याबाहेर सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी अशा धान्याची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर किराणा माल, पशुखाद्य, बियाणे, सिमेंटची वाहतूक केली जात आहे.

बांध ते मिल

जिल्ह्यात शेतकरी सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतात. शेतकऱ्यांनी एसटीकडे ट्रकची मागणी केल्यानंतर ट्रक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे. माल भरल्यानंतर सुरक्षित थेट ऑईल मिलवर पोहोचविला जात आहे.

कोट...

‘एसटी’ने दिलेला दर हा अन्य माल वाहतुकीपेक्षा कमी आहे. एखादा शेतकरीही त्याच्याकडे जास्त शेतमाल असेल तर त्यासाठी या ट्रकचा उपयोग करू शकतो. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी सेवेचा लाभ घ्यावा.

- हर्षद बनसोडे, मालवाहतूक कक्ष प्रमुख, उस्मानाबाद

पाॅईंटर

४२

उस्मानाबाद विभागातील एकूण ट्रक

२२२८

ट्रक फेऱ्या

३४१४९८

किलोमीटर प्रवास

१५६३९४०८

मिळाले उत्पन्न

आगार निहाय ट्रक

उस्मानाबाद ९

उमरगा ७

भूम ७

कळंब ८

तुळजापूर ८

परंडा ५

Web Title: ST earns Rs 1.5 crore from freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.