वारकऱ्यांसह एस.टी.लाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ८९ लाखांचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:07+5:302021-07-22T04:21:07+5:30
उस्मानाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे महामंडळातर्फे पंढरपूरसाठी विशेष बसफेऱ्या सोडण्यात येत होत्या. ...
उस्मानाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे महामंडळातर्फे पंढरपूरसाठी विशेष बसफेऱ्या सोडण्यात येत होत्या. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनाच्या सावटामुळे पंढरीची वारी रद्द झाली आहे. परिणामी, महामंडळाला ८९ लाख रुपयांचा फटका बसला आहे. यातून उभारी घेण्यासाठी भाविकांसारखीच एसटीलासुद्धा पंढरीची ओढ लागली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलांची वारी करण्यात येते. यामध्ये अनेक वारकरी सहभागी होत असतात. या वारीसाठी महामंडळातर्फे विशेष बसफऱ्या सोडण्यात येतात. उस्मानाबाद विभागाअंतर्गत सहा आगारातून जवळपास १६५ बसेस सोडण्यात येतात. त्याला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. यातून महामंडळास ८९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु, मागील वर्षीपासून कोरोनाचे सावट आल्याने पंढरपूरच्या वारीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे वारीला जाण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ लागली आहे. काहींनी घरूनच विठ्ठलाचे नामस्मरण करण्याचा संकल्प केला आहे.
वारकऱ्यांचा हिरमोड
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. त्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. अनेकजण एकादशीच्या अगाेदरही जाऊन दर्शन घेऊन आले, तर काहींनी पंढरी गाठली आहे.
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
१ आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून अनेक पालख्या पंढरपूरला जात असतात. साधारणत: दरवर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातून १० ते १२ पालख्या जात होत्या. शिवाय बसेसनीही अनेक वारकरी वारीला पंढरीच्या दर्शनाला जात होते.
२. पंढरपुरात पोहोचताच दिंडीमध्ये सहभागी होणारे वारकरी चंद्रभागेत स्नान करतात. पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असतो. दिंडी जसजशी पुढे सरकते तसे दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत जात असते. प्रत्येक दिंडीला दिनक्रम ठरलेला असतो. यात पहाटे काकडा आरती, संध्याकाळी हरिपाठ व रात्री मुक्कामाच्या ठिकाणी हरिकीर्तन असा कार्यक्रम असतो. दररोज १५ ते २० किलोमीटर पायपीट करीत वारकरी पंढरपुरात पोहोचत असतात.
पॉईंटर...
१६६
बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या
८९०००००
रुपये उत्पन्न मिळायचे एसटीला
९९०००
प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे
वारकऱ्यांचे गावी मन रमेना
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात होतो. बसने प्रवास करून आळंदी गाठत होतो. आळंदी येथील पालखीत सहभागी होऊन पंढरपूर गाठत होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीला जाता आले नाही. यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाचीही वारी टळली.
सुधाकर बुकन, वारकरी
मागील २५ वर्षांपासून नित्यनियमाने आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला जात होतो. पैठणला बसने जाऊन पालखीत सहभागी होऊन पंढरपूरला जात. गतवर्षीपासून कोरोनामुळे वारीला जाता आले नाही.
दशरथ सिरसट, वारकरी