एसटीचे स्वच्छतेकडे होतेय दुर्लक्ष ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:21+5:302021-08-22T04:35:21+5:30
उस्मानाबाद : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास समजले जाते. मात्र, कोरोना काळात बसेस अनेक महिने आगारात थांबून राहिल्याने बसेसची दुरवस्था ...
उस्मानाबाद : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास समजले जाते. मात्र, कोरोना काळात बसेस अनेक महिने आगारात थांबून राहिल्याने बसेसची दुरवस्था झाली. काही बसेसचा पत्रा खिळखिळा झाला आहे. त्यामुळे रिमझिम पावसातही काही बसेला गळती लागत आहेत. शिवाय, बहुतांश बसेसची वेळोवेळी स्वच्छता राखली जात नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
खाजगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन एसटी बसमध्ये सातत्याने बदल केले जात असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे आजघडीला एसटी सेवा टिकून आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोना काळात काही महिने बसेस आगारातच थांबून राहिल्याने अनेक बसेसची दुरवस्था झाली होती. महामंडळाने बसेसची डागडुजी केली आहे. बोटावर मोजण्याइतक्या बसेसचे पत्रे खराब आढळून येतात. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता राखली जात नसल्याचे आढळून आले. प्रवाशांकडूनही बसच्या खिडक्या तसेच आसनाच्या शेजारीची थुंकत असतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करीत प्रवास करावा लागतो. बसेसची वेळोवळी साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कोट...
कोरोना काळात दीड महिने बसेस बंद होत्या. नादुरुस्त बसची दुरुस्ती केली आहे. बसमध्ये थुंकणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असते. याबाबत वाहकांना सूचना देण्यात येणार आहेत.
पांडुरंग पाटील, आगार प्रमुख, उस्मानाबाद
एसटीचा कसरतीचा प्रवास
एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. त्यामुळे खाजगी वाहनाऐवजी एसटीने प्रवासाला प्राधान्य देतो. मात्र, अनेक आसने धुळीने माखलेली असतात. रुमालाने ते स्वच्छ करुन बसावे लागते.
विशाल मस्के, प्रवासी
खाजगी वाहनात स्वच्छता असते. एसटीच्या लांब पल्ल्याच्या बसेस वगळता ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता ठेवली जात नाही. खिडकी, आसन थुंकून घाण झालेले असते. एसटीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
पृथ्वीराज माने, प्रवासी
गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही
जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर या सहा आगाराच्या एकूण ४२२ बसेस असून, यापैकी सध्या ३३० बसेस सुरु आहेत. प्रतिदिन ७५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळास ३२ लाखाचे उत्पन्न मिळत आहे.
उस्मानाबाद आगाराच्या ७७ बसेस असून, या बसपैकी ७० बसेस दररोज धावत आहेत. आगारास ७ लाख रुपये उत्पन्न मिळते. डिझेलसाठी ६ लाख ५० हजार रुपये खर्च, पगारासाठी ४ लाख रुपये प्रतिदिन खर्च होतो. तर मेंटेनन्सला सुमारे ५० हजार रुपये खर्च करावे लागतात. उत्पन्न ७ लाख रुपये व खर्च ११ लाख रुपये होत आहे. अशीच स्थिती अन्य आगाराची आहे. सर्व बसेस सुरू झाल्यानंतर उत्पन्न वाढेल, अशी आशा एसटीला आहे.