तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:05 PM2017-09-21T17:05:00+5:302017-09-21T17:05:20+5:30
साडेतीन शक्तीपिठापैकी पूर्णपीठ असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास गुरूवारी दुपारी १२ वाजता घटस्थापनेने विधीवत प्रारंभ झाला़ मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व भारती गमे या दांपत्यांच्या हस्ते सिंह गाभा-यात घटकलशाची पूजा करून घटस्थापना करण्यात आली़
तुळजापूर ( उस्मानाबाद ), दि. 21 : साडेतीन शक्तीपिठापैकी पूर्णपीठ असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास गुरूवारी दुपारी १२ वाजता घटस्थापनेने विधीवत प्रारंभ झाला़. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व भारती गमे या दांपत्यांच्या हस्ते सिंह गाभा-यात घटकलशाची पूजा करून घटस्थापना करण्यात आली़. ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’चा गजर, संबळ, तुतारी, ताशांच्या वाद्यात तुळजापूर नगरी भक्तीने नाहून निघाली होती़.
गुरूवारी सकाळच्या नित्योपचार पंचामृत अभिषेक पूजेनंतर देवीची वस्त्रालंकार पूजा मांडण्यात आली. त्यानंतर नैवेद्य, धुपारती, अंगारा हे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर गोमुख तीर्थावर तीन घटकलश मांडण्यात आले. यात कल्लोळ व गोमुख यातील जल भरण्यात आले. या तिन्ही घटकलशांची पारंपारिक पद्धतीने मांडणी झाल्यावर गमे दांपत्यांनी तिन्ही घटकलशांचे विधिवत पूजन केले. या पूजेननंतर तिन्ही घटकलश वाजत-गाजत मंदिरात आणण्यात आले. यातील एक घटकलश तुळजाभवानीच्या चरणी लावून सिंह गाभाºयात पूजन करून गमे दांपत्यांच्या हस्ते बसवून घटस्थापना करण्यात आली़
मंदिरातील घटस्थापनेनंतर उर्वरित दोन घटकलशांची मंदिर परिसरातील उपदेवतांसमोर यजमानांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. देवता व उपदेवता यांच्या घटस्थापनेनंतर मंदिरात चालणा-या नऊ दिवस धार्मिक विधीसाठी गमे यांनी ब्राह्मवृंदास वर्णी दिली़ तर कोल्हापूर संस्थानच्या वतीने प्रसन्न व गीता कोंडो यांनी व रायबहादर संस्थान हैदराबाद यांच्या वतीने उपाध्ये बाळासाहेब प्रयाग- नम्रता प्रयाग यांनी ब्रम्हवृंदास वर्णी दिली़ त्यानंतर शहरात घरोघरी घटस्थापना झाली़.
यावेळी महंत तुकोजी, महंत हमरोजी, भोपी पजारी धीरज पाटील, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, संचालक सुधीर रोचकरी, प्रा. संभाजी भोसले, भोपी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, शशिकांत पाटील, अतुल मलबा, संजय सोंजी, दिनेश परमेश्वर, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, श्रीराम आपसिंगेकर, गजानन लसणे, विश्वस्त आ. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, दिनेश झांपले, चेतन गिरासे, व्यवस्थापक सुनील पवार, सेवेकरी अंबादास औटी, प्रफुल्ल शेटे, विश्वनाथ शेटे, पलंगे, पवेकर, छत्रे, चोपदार यांच्यासह पुजारी, उपाध्ये उपस्थित होते.
तत्पूर्वी रात्री एक वाजता आठ दिवसीय देवीची मंचकी निद्रा संपून भोपी पुजाºयांनी देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना केली़ त्यानंतर विशेष पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला़ या अभिषेक पूजेनंतर देवीची सिंहासनास्थ अलंकार पूजा मांडण्यात आली. यावेळी भाविकांची धर्मदर्शन व मुखदर्शनास मोठी गर्दी होती. यानंतर सकाळी ६ वाजता घाट होऊन नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ झाला. यावळी महंत, भोपी पुजारी, सेवेकरी, पुजारी, उपाध्ये व भाविक तसेच मंदिर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भाविकांची अलोट गर्दी
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुरूवारी घटस्थापनेच्या दिवशी तुळजापूर नगरीत भाविकांची अलोट गर्दी झाली होती़ शहरातील बसस्थानक, मंदिर परिसर, दर्शन मंडपासह इतर ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली़.