प्रत्येक गावात किमान एक बसफेरी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:03+5:302021-01-01T04:22:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक व वाहकांवर कामाचा अतिरिक्त भार न देता सेवा सुरळीत करावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाने एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय फेऱ्या त्वरित सुरू करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. ग्रामीण भागातून मागणी असतानाही अनेक फेऱ्या सुरू करण्यात एस. टी.च्या विभागीय कार्यालयाला यश आलेले नाही. अनेकदा अपुरे कर्मचारी असल्याने फेऱ्या रद्द करण्याची वेळ एस. टी. महामंडळावर येते.
मुंबईतील लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्ट सेवेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातून २०० ते २५० कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येक आठवड्याला मुंबईत पाठवली जाते. पर्यायाने जिल्ह्यातील व तालुक्यातील एस. टी. सेवा यामुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबईला कर्मचारी पाठविण्याचे थांबवून ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, सिद्धार्थ वाघमारे, भैरवनाथ लकडे, आतिष वाघमारे, प्रेम भांडे, कुमार वाघमारे, ऋषी आदमाने, बबलू शिंदे, बाबा टोपे, अजित ओहाळ, निखील जाधव, अमोल सोनवणे आदींच्या सह्या आहेत.