बालरुग्ण कोविड उपचार केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:28+5:302021-05-21T04:34:28+5:30
कळंब : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता व ती लहान मुलांसाठी धोकादायक वर्तवली जात असल्याने कळंब येथे बालरुग्ण कोविड ...
कळंब : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता व ती लहान मुलांसाठी धोकादायक वर्तवली जात असल्याने कळंब येथे बालरुग्ण कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करावे. तसेच कळंब उपजिल्हा रुग्णालयात एचआरसीटी तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी कळंबचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब शहर हे मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असले तरी येथील वैद्यकीय सुविधा अत्यंत तोकड्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कळंब शहर व तालुक्यातील बालकांवर कोरोनाच्या संभाव्य लाटेत उपचार करण्यासाठी बालरुग्ण कोविड उपचार सेंटर चालू करण्याचे काम त्वरित हाती घ्यावे, असे मुंदडा यांनी निवेदनात म्हटले आहे.
कळंब शहरात डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. रमेश जाधवर, डॉ. अभिजित लोंढे, डॉ. श्याम चौधरी हे बालरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यांचा टास्क फोर्स स्थानिक पातळीवर बनवून लहान मुलांसाठी सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने त्वरित करावे. तसेच कळंब उपजिल्हा रुग्णालयात एचआरसीटी ही तपासणी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही मुंदडा यांनी या निवेदनात केली आहे.