पंधराव्या वित्त आयोगातंर्गत कामे तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:24+5:302021-06-30T04:21:24+5:30
(फोटो : २९ समीर सुतके) उमरगा : पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या विविध विकास योजना, मग्रारोहयो अंतर्गतच्या वैयक्तिक व सार्वजनिक ...
(फोटो : २९ समीर सुतके)
उमरगा : पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या विविध विकास योजना, मग्रारोहयो अंतर्गतच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या विविध योजना, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मंगळवारी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी उमरगा पंचायत समितीला भेट देत गटविकास अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी अंतर्गत कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सभापती सचिन पाटील व गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांच्याशी विविध विकासकामानबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील कोरोना परिस्थिती, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार व मानधनाबाबत चर्चा करून पंधराव्या वित्त आयोगाचा निधीचे तीन हप्ते ग्रामपंचायत खात्यावर जमा आहेत. सदरील रक्कम खर्च करणे, वृक्षलागवड, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ७४ शेतरस्ते, सार्वजनिक ८१ विहिरी, वैयक्तिक मंजूर ५ विहिरींच्या कामाची सद्य:स्थिती, रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर ३३८ घरकुल, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०२०-२१ वर्षासाठी मंजूर असलेली ३१ घरकुल, डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत मंजूर १५ विहिरींची कामे व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजूर १५ विहिरींची कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी विजय वाघमारे, याकूब लदाफ, पप्पू सगर, कल्लेश्वर कोट्टरगे, राजू मुल्ला, खातेप्रमुख व विविध गावांचे ग्रामसेवक उपस्थित होते.