‘तू तुझ्या औकातीत रहा’, खा. ओमराजे निंबळकर अन् आ. राणा जगजितसिंह पाटील पुन्हा भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 05:58 PM2022-12-03T17:58:16+5:302022-12-03T18:00:52+5:30
आज बऱ्याच वर्षांनंतर खा. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे आमने-सामने आले होते.
उस्मानाबादः जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीकविम्याबाबतच्या बैठकीत शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील पुन्हा भिडले. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासमोरच दोघांतील उफाळलेला वाद अरेतुरेच्या भाषेपर्यंत गेला. खा. ओमराजे निंबाळकर आणि आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यात एकमेकांची औकात काढण्यापर्यंत प्रकरण गेले. ‘तू तुझ्या औकातीत राहा. तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात सगळ्यांना माहीत आहे,’ अशा शब्दांत खा. ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटलांना सुनावले.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात निंबाळकर-पाटील हा जुनाच वाद आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर तर हा वाद वेगळ्या वळणावर गेला. आता दुसऱ्या पिढीतील लोकप्रतिनिधीही जेव्हाजेव्हा समोरसमोर येतात तेव्हातेव्हा पुन्हा वाद उफाळून येतोच. आजही जिल्हाधिकारी कार्यालयात आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पीकविम्याच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीलानंतर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरही पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यास सुरूवात केली. तसेच या बैठकीला लोकप्रतिनिधींना का बोलावण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. यावर आ. राणा यांनी ओमराजेंना उद्देशून ‘बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे’ असे म्हटले.
हे ऐकून ओमराजेंचा पारा चढला. ‘तू नीट बोल, बाळ म्हणू नकोस. तुझ्या औकातीत राहा, तू आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहे. तू नीट बोल’ अशा शब्दांत ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांना सुनावले. यावर ‘बाळच आहेस तू’ असा टोमणा आ. राणा यांनी मारला. संतापलेल्या ओमराजेंनी पुन्हा ‘तुमचे संस्कार, तुमची औकात सगळे माहीत आहे. तुला बोललेलो नाही. मला तुला बोलायचे कारणही नाही’ असा एकेरी उल्लेख करत सुनावले. या दोन लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेली ही हमरीतुमरी पाहून जिल्हाधिकारी सचिन ओमबासेही चक्रावले. त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.