घरी राहून ही अख्ख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:47+5:302021-04-29T04:23:47+5:30
(पॉझिटिव्ह स्टोरीचा लोगो) कळंब : ताप आल्याने वेळ न घालवता त्यांनी तत्काळ घरातील चौघांच्या टेस्ट केल्या. त्या ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर ...
(पॉझिटिव्ह स्टोरीचा लोगो)
कळंब : ताप आल्याने वेळ न घालवता त्यांनी तत्काळ घरातील चौघांच्या टेस्ट केल्या. त्या ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर खंबीर मनाने होम आयसोलेट होण्याचा पर्याय निवडत घरीच उपचार घेतले. या दरम्यान, केवळ ‘पॉझिटिव्हिटी’ च्या बळावर आमचे कुटुंब दहा दिवसांत कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले, हे उद्गार आहेत कळंब येथील भारत शेळके यांचे.
भारत शेळके, त्यांच्या पत्नी व दोन मुलांना कोरोनाने गाठले. यानंतर त्यांनी होम आयसोलेट होत डॉ. श्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घरीच उपचार घेतले. यासाठी प्रथमतः मनाला खंबीर करत भीती घालवली . यानंतर योग्य आहार, डॉक्टरांचा सल्ला व औषधी यांचा अवलंब करत दहा दिवस एकमेकांची काळजी घेत काढले.
दुसरीकडे बाहेर अनेकजण बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन अशा अनेक विवंचनेत अडकले असताना शेळके कुटुंब मात्र केवळ दृढ निश्चयाने कोरोनाशी लढले. यासाठी भीतीला जवळ थारा दिला नाही. आहार, विहार व उपचार याला महत्त्व दिले. आज ते या संकटातून सुखरूप बाहेर पडले असून, त्यांचा हा दाखला महामारीच्या प्रकोपाने खचलेल्या मनाला उभारी देणारे असेच आहे.
प्रतिक्रिया
कोरोना झाला की लोक घाबरतात. विनाकारण काळजी करतात. काळजी करायची नाही अन् घाबरायचे ही नाही. स्वतः आनंदी राहायचे आणि कुटुंबाला पण आनंदी ठेवायचे . आम्ही यासाठी प्रथम बातम्या पाहणे बंद करत टीव्हीवर केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम पाहिले. एकमेकांची काळजी, डॉक्टरांचा सल्ला व औषधी घेतली. यास चांगल्या मनोबलामुळे अधिक प्रतिसाद मिळाला.
- भारत शेळके
कोरोना झाल्यानंतर आई-वडिलांनी खूप मोठा आधार दिला. नियमितपणे फळे, खाण्याचे पदार्थ, अंडी, दूध, चिकन आम्हाला पुरवले. याशिवाय आम्ही सकाळी व चार वाजता नाश्ता, दुपारी व रात्री जेवण असा योग्य व समतोल आहार घेतला. सकाळी गरम पाणी, लिंबू परत दिवसातून एकदा नारळ पाणी घेत असा दिनक्रम कायम ठेवला. चांगला आहार आणि आधार यामुळे या आजारातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो.
- मोहिनी शेळके
आमचे सर्व कुटुंब या काळात घरातच एकत्रच होताे . आई, बाबा सोबत होतेच. यामुळे भीती राहिली नाही. भीती बाळगली ही नाही. एकमेकांचे ऑक्सिजन तपासणी, काळजी घेण्याचे काम केले जायचे. यामुळे आम्ही दहा दिवसांत या संकटाला दूर करण्यात यश मिळवले आहे.
- आदित्य शेळके
आम्ही घरातच उपचार घेतले. घरातील सर्वजण एकमेकांची काळजी घेत होतो. कॅरम व बुद्धीबळाचे डाव यातून आमचा वेळ घालवत होतो. टीव्ही पाहायचो, खेळ खेळायचो. एकत्र असल्याने भीती वाटत नव्हती. याबरोबरच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधी घेत होतोत. यामुळे आम्ही घरीच कोरोनामुक्त झालो आहोत.
- गौरी शेळके