दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:02+5:302021-05-20T04:35:02+5:30
भूम : शहरातील भूम-बार्शी रोडवरील इंदिरा नगर भागात असलेल्या पुलानजीक टाकाऊ अन्नपदार्थ टाकले जात असल्याने कमालीची दुर्गंधी पसरत ...
भूम : शहरातील भूम-बार्शी रोडवरील इंदिरा नगर भागात असलेल्या पुलानजीक टाकाऊ अन्नपदार्थ टाकले जात असल्याने कमालीची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील विविध भागात मांस विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. हे विक्रेते बार्शी रस्त्यावरील पुलाच्या बाजूला घाण टाकत असून, यामुळे दुर्गंधीसोबतच मोकाट जनावरांचा त्रास देखील या भागातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. आरोग्य उत्तम राहावे याकरिता रोज किमान तीन किलोमीटर फिरणे हा उत्तम पर्याय असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. यामुळे शहरातील बहुतांश नागरिक परांडा रोडवरील औद्योगिक क्षेत्रात वाहनांची वर्दळ कमी असल्याने योगासने व फिरण्यासाठी या भागात जातात. त्यांना याच पुलावरून ये-जा करावी लागते. मात्र, त्यांनाही दुर्गंधी व मोकाट कुत्र्यांचा त्रास येथे होत आहे.
चौकट...........
विक्रेत्यांनी येथे घाण टाकल्यामुळे ती खाण्यासाठी कावळे व श्वान येत आहेत. अनेकदा या प्राणी व पक्ष्यांमध्ये खाण्यासाठी भांडणे होतात. तसेच हे प्राणी घराजवळ घाण आणत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.
- फिरोज मोगल, रहिवासी, इंदिरा नगर
तूर्तास या भागातील सर्वच व्यावसायिकांना घाण न टाकण्याबाबत नोटीस देण्यात येईल. यानंतरही हा प्रकार सुरूच राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास येईल.
- तानाजी चव्हाण, मुख्याधिकरी, नगर परिषद भूम