उस्मानाबादेत १०० ब्रास वाळू, सॅण्डक्रशचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 07:55 PM2021-08-28T19:55:37+5:302021-08-28T19:56:59+5:30
उस्मानाबाद शहरात काही मंडळी अशा स्वरूपाची कुठलीही परवानगी न घेता, रस्त्यालगत म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी वाळू, सॅण्डक्रशचा साठा केला हाेता.
उस्मानाबाद : मागील तीन-चार दिवसांपासून महसूल विभागाने गाैण खनिजाचे अवैध उत्खनन तसेच अवैधरीत्या वाळू, सॅण्डक्रश साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची माेहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पथकाने उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक ठिकाणी साठविलेली सुमारे १०० ब्रास वाळू, सॅण्डक्रश जप्त करण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी वाळू अथवा सॅण्डक्रश आदी गाैण खनिजाचा साठा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते. परंतु, उस्मानाबाद शहरात काही मंडळी अशा स्वरूपाची कुठलीही परवानगी न घेता, रस्त्यालगत म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी वाळू, सॅण्डक्रशचा साठा केला हाेता. ही बाब महसूल विभागाला समाजल्यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी साठेबाज व्यक्तींविरुद्ध कारवाई करून वाळू व सॅण्डक्रश जप्त करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे पथक शनिवारी सकाळी स्पाॅटवर दाखल झाले. साठा माेठ्या प्रमाणात असल्याने स्वत: तहसीलदार माळी हेही स्पाॅटवर पाेहाेचले. यावेळी पथकाने चाैकशी केली असता, सुमारे १०० ब्रासपेक्षा अधिक वाळू व सॅण्डक्रशचा साठा केल्याचे समाेर आले. यानंतर पथकाने हा सर्व साठा जप्त करून जेसीबीच्या साहाय्याने उचलला. दरम्यान, महसूल विभागाच्या वतीने सदरील वाळू तसेच सॅण्डक्रशचा लिलाव केला जाणार असल्याचे तहसीलदार माळी यांच्याकडून सांगण्यात आले.
परवानगीचा पत्ता नाही...
काही मंडळी गुजरात तसेच अन्य राज्यांतून वाळू आणून साठा करीत आहे. यानंतर ही वाळू अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जाते. दरम्यान, अशा प्रकारे साठा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांची रितसर परवानगी घ्यावी लागते. परंतु, त्याकडे काणाडाेळा करून वाळूसह सॅण्डक्रशचा अवैधरीत्या साठा करण्यात आला हाेता. रितसर परवानगी नसल्यानेच हा साठा जप्त केला.
जप्त साठ्याचा लिलाव केला जाईल
परवानगी न घेता वाळू, सॅण्डक्रशचा साठा केल्याचे समाेर आल्यानंतर पथकास कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यानुसार शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. जवळपास १०० ब्रासपेक्षा अधिक साठा जप्त केला आहे. प्रशासनाच्या वतीने सदरील वाळू तसेच सॅण्डक्रशचा लिलाव केला जाईल.
- गणेश माळी, तहसीलदार, उस्मानाबाद