१३ लाख रुपये किमतीचा डिझेलसदृश द्रवाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:25+5:302021-06-27T04:21:25+5:30

उमरगा : गेल्या कित्येक वर्षांपासून अवैद्य धंद्यामुळे चर्चेत असलेली उमरगा शहराजवळील जकेकूर शिवारातील औद्योगिक वसाहतीत आता आणखीन एक प्रकरण ...

Stocks of diesel-like liquids worth Rs 13 lakh seized | १३ लाख रुपये किमतीचा डिझेलसदृश द्रवाचा साठा जप्त

१३ लाख रुपये किमतीचा डिझेलसदृश द्रवाचा साठा जप्त

googlenewsNext

उमरगा : गेल्या कित्येक वर्षांपासून अवैद्य धंद्यामुळे चर्चेत असलेली उमरगा शहराजवळील जकेकूर शिवारातील औद्योगिक वसाहतीत आता आणखीन एक प्रकरण उघडकीस आले आहे. तांदळाच्या उद्योग केंद्रात अनधिकृतपणे पेट्रोलियम पदार्थाचा (डिझेलसदृश द्रव) साठा आढळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या पथकाने २४ जून राेजी कारवाई करीत घटनास्थळावरून डिझेलसदृश द्रव पदार्थासह सुमारे १३ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी कर्नाटकातील रहिवासी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकासह जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा शहरापासून काही अंतरावर जकेकूर शिवारात औद्याेगिक वसाहत आहे. या वसाहतीतच श्री लक्ष्मी तिम्मप्पा फूड इंडस्ट्रीज (राइस मिल) नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये सुमारे २५ हजार लिटर क्षमता असलेल्या एका टँकमध्ये पेट्राेलियम पदार्थांची साठवणूक केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पाेकाॅ. चैतन्य कोनगुलवाड, बोदनवाड यांचे पथक बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संबंधित कंपनीत दाखल झाले. यावेळी तेथील एका लाेखंडी टँकमध्ये पेट्राेलियम पदार्थ असल्याचे दिसून आले. यानंतर पथकाने उपस्थित जाकीर पाशामियाँ चिद्री (रा. दुबलगुंडी, ता. हुमनाबाद, जि. बीदर) या कामगाराकडे चाैकशी केली असता, कंपनीचे व्यवस्थापक महेश गवळी (रा. आळंद) हे असल्याचे सांगितले. यानंतर पाेलिसांनी गवळी यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी संबंधित साठ्याच्या अनुषंगाने काेणतीही कागदपत्रे वा अधिकृत कायदेशीर माहिती दिली नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी उदमले यांनी घटनास्थळाला भेट देऊन दोन शासकीय पंचासमक्ष गुरुवारी सायंकाळी पंचनामा केला. जप्तीमध्ये ११ लाख २८ हजार रुपये किमतीचे बारा हजार लिटर डिझेलसदृश द्रव पदार्थ, दोन लाख रुपये किमतीचा पेट्रोलियम पदार्थ साठवणुकीसाठीचा लोखंडी टँक, दहा हजार रुपये किमतीची एक हिरव्या रंगाची सुुगुना कंपनीची इलेक्ट्रिक मोटार, पंधरा हजार रुपये किमतीची एक निळ्या पांढऱ्या रंगाची डिझेल भरण्याकरिता वापरण्यात येणारी मशीन, असे एकूण १३ लाख ५३ हजार रुपये किमतीची साधने व डिझेलसदृश द्रव पदार्थ जप्त करण्यात आले. सुरक्षिततेकरिता पोलीस गार्ड तैनात करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चैतन्य कोंगुलवार यांच्या फिर्यादीनुसार महेश गवळी व जागा मालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तूचे अधिनियम कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी डिझेलसदृश द्रव पदार्थाचे नमुने सी.ए. तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव हे करीत आहेत.

चाैकट...

उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. येथे १३ जानेवारी २०१८ साली बंगळुरू येथील केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने धाड टाकून मेथोक्युलाईन हे ५० लाखांचे अंत्यत महागडे अंमली पदार्थ जप्त केले होते. हे अंमली पदार्थ या वसाहतीत तयार करून पूर्ण भारतात वितरित केले जात होते. त्याच बरोबर या औद्योगिक वसाहतीत तांदूळ, गहू आदींचा काळाबाजार होत असल्याची चर्चा असून यापूर्वीही येथे अवैद्यरीत्या तांदूळ साठविल्याप्रकरणी कारवाई झालेली आहे. येथील एका तांदूळ कारखान्यात दुसऱ्या राज्यातील रेशनचे तांदूळ आणून प्रक्रिया केली जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: Stocks of diesel-like liquids worth Rs 13 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.