वाणेगावातील अवैध दारू विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:59+5:302021-03-24T04:29:59+5:30
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वाणेगाव येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी, अशी ...
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वाणेगाव येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.
वाणेगाव येथे अवैधरित्या देशी दारू, हात भट्टी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. दारू विक्रेत्यास पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्याने गावात दारू धंदे बोकाळले असल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांमधून होत आहे. यातून भांडण - तंटेही वाढले आहेत. नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त गावाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे ही अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, गावात कायम दारूबंदीसाठी आम्ही गावातील महिला पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पोलीस प्रशासनाला देणार असून, दारू विक्री व्यवसाय बंद करण्यासाठी महिलांचे मोठे आंदोलन उभे करण्याचीसुद्धा तयारी केली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सावित्रीबाई देवकर यांनी दिली.
कोट........
गावात सहजासहजी दारू मिळत असल्याने तरुणाई दारूच्या आहारी गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबात भांडण तंटे वाढत आहेत. यामुळेच ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावातील दारू बंदीचा निर्धार केला आहे. त्याला पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे.
मुक्ताबाई देवकर, ग्रा. पं. सदस्या
सर्व गावकऱ्यांच्या एकमताने दारू बंदीचा ठराव घेण्याचे ठरले आहे. दारू बंद करण्याबाबत पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येत्या काळात दारूबंदीसाठी पोलीस स्टेशनवर गावातील महिलांचा मोर्चा काढावा लागणार आहे.
- आप्पासाहेब पाटील, उपसरपंच