साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला विचारांचे वादळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:15 AM2020-01-10T06:15:05+5:302020-01-10T06:15:15+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणाबरोबरच साहित्यिक, वैचारिक चर्चा वाद-प्रतिवाद व संवादांसाठी खुले होईल.
प्रवीण खापरे
उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणाबरोबरच साहित्यिक, वैचारिक चर्चा वाद-प्रतिवाद व संवादांसाठी खुले होईल. संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमान प्रकरणाचा निषेध करा, एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याची शिफारस करणारा ठराव करा, अशा मागण्यांमुळे आधीच वादळ उठले आहे.
संत गोरोबा काकांच्या नगरीत ९३ व्या साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. मात्र, संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत अध्यक्षांचे भाषण सार्वजनिक करण्यात आलेले नाही. त्यामुळे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणात नेमके कोणते मुद्दे असणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वीच नियोजित अध्यक्ष म्हणून दिब्रिटो यांनी आपल्या भाषणाचा मूळ मुद्दा भारतीय राज्यघटना व धर्मनिरपेक्षता असल्याचे स्पष्ट केले आहे.
साहित्य आणि संस्कृतीवर भाष्य करताना संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही आपले परखड विचार मांडतील. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवर ते विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादमध्ये रिपब्लिकन सेनेने एनआरसी व नागरिकत्व कायदा रद्द करण्याचा ठराव साहित्य संमेलनात मंजूर करण्यात यावा, असे पत्रक काढले आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हेही पूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून अवमान केल्याप्रकरणी निषेधाचा ठराव घ्यावा, असा सूरही सावरकरप्रेमींनी आळवला आहे.
महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवी यांनी जेएनयूमधील हल्ल्यावर आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तसेच नागरिकत्व कायद्याचा अंमल करू नका म्हणून पुकारलेला एल्गार हाच संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा गाभा असणार आहे.
>वाचण्यासारखे काय आहे?
उस्मानाबादचे साहित्य संमेलन ‘एकविसाव्या शतकात मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ हे सांगणार आहे. तसा स्वतंत्र परिसंवादच होणार आहे. शेतकरी आत्महत्या आणि मराठवाडा यावर तसेच ‘शेतकऱ्यांचा आसूड : महात्मा फुले’ या विषयावर आजच्या संदर्भात संमेलनात चर्चा होणार आहे.
>दिब्रिटो आजारी... संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांना कंबरदुखीचा त्रास होत असल्याने ते सकाळी ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांचे भाचे जेम्स लोबो यांनी सांगितले. त्यात उद््घाटक महानोर यांचीही प्रकृती ठीक नसल्याने ग्रंथदिंडीला दोन्ही मान्यवर उपस्थित न राहण्याची शक्यता आहे. दिंडीवेळी जाहीर वाद टाळण्यासाठी दोघे अनुपस्थित राहतील, अशी चर्चा संमेलनस्थळी सुरू आहे.
>उद्घाटक महानोर यांना जाऊ नका असा फोन
साहित्य संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना़ धों़ महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा फोन करण्यात आला. परंतु, महानोर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत़ महानोर यांचे नातू शशिकांत यांनी त्यास दुजोरा दिला. फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे़ महानोर यांनीही येऊ असे आवाहन आम्ही केले आहे, असा संदेश ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीस पाठविला आहे़