परंड्यात शेतकऱ्यांनी अल्प दर मिळाल्याने रस्त्यावर फेकला कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:03 PM2018-12-08T18:03:43+5:302018-12-08T18:04:17+5:30
परंडा (उस्मानाबाद ) : कांद्याला २५ रुपये क्विंटल अर्थात २५ पैसे किलो भाव मिळत आहे़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी ...
परंडा (उस्मानाबाद ) : कांद्याला २५ रुपये क्विंटल अर्थात २५ पैसे किलो भाव मिळत आहे़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर कांदा फेकून ठिय्या आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती़
कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली़ मात्र कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शनिवारी परंडा येथे आंदोलन केले़ शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर कांदा फेकून दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली.
आंदोलनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर घोगरे, तालुका युवाध्यक्ष शिवाजी ठवरे, शहराध्यक्ष सादात काझी, सुरेश डाकवाले, फारूक शेख, आरीफ शेख, रामेश्वर सोनमाळी, दादासाहेब पाडूळे, उत्रेश्वर गुडे, प्रविण डाकवाले, राजू पाटील, उत्रेश्वर ठवरे, रामहरी हागवणे, वसुदेव बोबडे, नंदू कुंभार, धर्मा जगदाळे, विकास बोबडे याच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही़ त्यामुळे कांदा निर्यातीस चालना द्यावी, कमीत कमी २ हजार रुपये भाव द्यावा, दुष्काळामुळे रबी पिके, फळबागा पाण्या अभावी जळून गेल्या आहेत़ याचे पंचनामे तात्काळ करून अनुदान द्यावे यासह इतर मागण्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ आंदोलनादरम्यान पोउपनि संतोष जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.