शिवसेनेच्या हाकेनंतर उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद
By बाबुराव चव्हाण | Published: October 29, 2022 01:03 PM2022-10-29T13:03:39+5:302022-10-29T13:04:57+5:30
आमदारांच्या आंदाेलनाला पाठिंबा, दुचाकी रॅली काढून केले बंदचे आवाहन
उस्मानाबाद: शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा कचेरीसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे शनिवारी उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली हाेती. शिवसेनेच्या या हाकेला व्यापार्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट हाेता.
पीकविमा खरीप हंगाम २०२० चे ३३० कोटी, २०२१ चे उर्वरित ३८८ कोटी, नुकसान भरपाईचे २४८ कोटी रुपये अनुदान तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी साेमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. अद्याप ठाेस ताेडगा न निघाल्याने त्यांचे हे आंदाेलन सहाव्या दिवशीही सुरूच आहे. पीक विम्यासाठीच्या त्यांच्या या लढ्याला समर्थन देण्यासाठी ग्रामीण भागातही आता आंदाेलने सुरू झाली आहेत. दरम्यान, शनिवारी शिवसेनेकडून उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली हाेती. त्यानुसार शिवसैनिकांनी सकाळीच संपूर्ण शहरातून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. शिवसेनेच्या या आवाहनास प्रतिसाद देत व्यापार्यांनीही आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहराच्या सर्वच भागातील बाजारपेठेत शुकशुकाट हाेता.
रस्त्यावर टायर जाळले- एकीकडे शहर कडकडीत बंद असतानाच दुसरीकडे शिवसैनिकांनी शहरातील तेरणा काॅलेजसमाेरील रस्त्यावर टायरची जाळपाेळ केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली हाेती. शुक्रवारी लाेहार्यातही टायर जाळण्यात आले हाेते.