उस्मानाबादेत विद्यार्थिनीचा विनयभंग; संतप्त पालकांनी शिक्षकाला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:02 IST2020-03-11T13:49:01+5:302020-03-11T14:02:17+5:30
उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेत शहरातीलच एक विद्यार्थिनी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़

उस्मानाबादेत विद्यार्थिनीचा विनयभंग; संतप्त पालकांनी शिक्षकाला झोडपले
उस्मानाबाद : शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे़ यानंतर संतप्त पालकांनी त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला़ याप्रकरणी शिक्षकावर सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेत शहरातीलच एक विद्यार्थिनी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़ दरम्यान, वर्गात कोणीही नसताना या शाळेतीलच एक ५० वर्षीय शिक्षक या विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करीत होता़ सातत्याने हा प्रकार होत असताना शिक्षक विद्यार्थिनीस धमकावत असल्याचेही कळते़ दरम्यान, शनिवारीही या शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीसोबत पुन्हा चाळे केले़ यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनीने रडत-रडतच घर गाठून कुटूंबियांना याबाबतची कल्पना दिली़ मात्र, रविवारची शाळेला सुटी असल्याने या प्रकाराला वाचा फुटली नाही़ सोमवारी मात्र, पालकांनी शिक्षकाला घेरून चांगलेच चोपले.
आरोपी शिक्षकाला अटक
सोमवारी सकाळी शाळा उघडताच पीडित विद्यार्थिनीचे पालक व काही नागरिकांनी शाळेत धाव घेतली. संतापलेल्या पालक, नागरिकांनी त्याला तेथेच झोडपण्यास सुरुवात केली़ या शिक्षकास चोप देत पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठले व त्याला पोलिसांच्या स्वाधीन करुन तक्रार नोंदविली़ त्यानुसार आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी शिक्षकास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कस्तुरे यांनी दिली़ या शिक्षकाला यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते़