प्लॉटच्या नोंदणीसाठी लाच घेणारा दुय्यम निबंधक लाचलूचपतच्या जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 07:14 PM2018-12-03T19:14:30+5:302018-12-03T19:14:44+5:30
ही कारवाई दुपारी कळंब शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली़
उस्मानाबाद : प्लॉटची नोंदणी करण्यासाठी साडेचार हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या कळंब येथील दुय्यम निबंधकाविरूध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ही कारवाई सोमवारी दुपारी कळंब शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली़
तक्रारदाराने केलेल्या प्लॉटिंगमधील एक प्लॉटची विक्री केली होती़ त्या एक गुंठा प्लॉटची नोंदणी करण्यासाठी कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रितसर अर्ज केला होता़ या कामासाठी दुय्यम निबंधक राजरत्न बापूराव रणदिवे यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़ तक्रारीची शहानिशा करून पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बी़जी़आघाव, पोनि व्ही़आऱबहीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कळंब येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी दुपारी सापळा रचला़
यावेळी तक्रारदाराच्या कामासाठी राजरत्न रणदिवे यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून साडेचार हजार रूपये स्विकारल्यानंतर पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती़