दस्त नोंदणीबाबत अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:34+5:302021-02-16T04:33:34+5:30
कळंब : अकृषि आदेश,तात्पुरते व अंतीम रेखांकन यात गफलत करत कळंब दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदलेच कसे, असा प्रश्न ...
कळंब : अकृषि आदेश,तात्पुरते व अंतीम रेखांकन यात गफलत करत कळंब दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदलेच कसे, असा प्रश्न तलाठी संघटनेच्या तक्रारीनंतर उत्पन्न झाला असतानाच आता याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी वरिष्ठांना आपला अहवाल सादर केला आहे. पार्श्वभूमीवर झालेल्या अनियमित दस्तांची ‘सत्यता’ पडताळणी होते की सदर ‘संचिका’ लालबस्त्यात बांधली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कळंब येथील दुय्यम नोंदणी कार्यलायातील दस्त नोंदणीत अनियमितता झाल्याच्या काही गंभिर तक्रारी झाल्या होत्या. मात्र, पुढे याचा सोक्षमोक्ष काही लागला नाही. यातच आता दस्तूरखुद्द तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने या कार्यालयाच्या कामकाजासंदर्भात गंभीर आक्षेप नोंदवणारी तक्रार दिल्याने खळबळ उडाली होती.
यामध्ये अकृषी आदेशांची सत्यता, तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन यांची खातरजमा ना? करता, मुंबई तुकडेबंदी कायद्याचा भंग करत बेकायदेशीर दस्त नोंदवले जात असल्याचे नमूद केले होते. याशिवाय महसूल अधिनियम, नगर विकास विभाग, नोंदणी महानिरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेश, नियम, परिपत्रक व कायदे यांच्याकडे डोळेझाक केल्याचे उल्लेखित केले होते.
यामुळे आजवर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या ऐकिवात असलेल्या सुरस कथावर या तक्रारीने एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले होते. यामुळे एका प्रशासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संघटीत होत दुसऱ्या विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे दाखवलेले हे बोट आत्ता ‘संचिका बंद’ होते की पुढे कार्यवाहीत येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट...
‘नॉट फॉर सेल’ जागेवर आहे का?
एखाद्या शेत जमिनीवर भूखंड विक्री करायची असेल तर ते क्षेत्र अकृषि करणे गरजेचे आहे. यानंतर त्याचे तात्पुरते रेखांकन करत सदर भूभागावर रस्ते, गटारी, फोल, खुल्या जागेस संरक्षक निर्माण करणे बंधनकारक आहे. तोपर्यंत उक्त रेखांकनाच्या भाळी ‘नॉट फॉर सेल’ असा शिक्का हवा. या सुविधा विकसित केल्यानंतर अंतिम रेखांकन देण्यात येते व तद्नंतरच प्लॉट विकता येतात. याचेच दस्त नोंदणी, रितसर व्यवहार होतात. त्यामुळे यात अनियमितता झाली आहे का, ओपन स्पेस, रस्ते विकले गेले नाहीत ना, याची चौकशी होणं गरजेच आहे.
त्यांना नियम लागू नाहीत का?
दरम्यान, दस्त नोंदणी संदर्भात ३० मे २०११ रोजी जिल्हाधिकारी यांनी काही निर्देश दिलेले आहेत. याचे दुय्यम निबंधक व तलाठी यांनी पालन करणे गरजेचे आहे. यात दुय्यम निबंधक कार्यालय तर चुकीचे दस्त नोंदवतच आहे, परंतु तलाठ्यांनी याचे फेर नोंदवणे चुकीचे आहे. यामुळे दुय्यम निंबधक यांनी डोळे उघडत दस्त नोंदवावेत व तलाठी यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांचे पालन करावे अशी मागणी ॲड. अनंत चोंदे यांनी केली आहे.
तलाठी, मंडळ अधिकारी यांनाही दिल्या सूचना
दरम्यान, तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या तक्रारीनंतर कळंब येथील उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यानी वरिष्ठांना आपला अहवाल सादर केला आहे. वारंवार सूचना देवूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने हा अहवाल दिला आहे. याशिवाय तलाठी व मंडळ अधिकारी यांनाही सूचना देण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी सांगितले