पाणी वळविण्याबाबत प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:22+5:302021-06-04T04:25:22+5:30
कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याचे सर्वेक्षण करताना लगतच्या शिवारातील लघू तलावात पाणी वळतं करण्याची मागणी ...
कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याचे सर्वेक्षण करताना लगतच्या शिवारातील लघू तलावात पाणी वळतं करण्याची मागणी खासदार, आमदारांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. यानुसार मंत्री पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना यासंदर्भात आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मांजरा प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी एक्सेस होते. याचा विचार करत पुढे मांजरा नदीवर एकूण १५ उच्च पातळी बंधारे (बॅरेज) बांधण्यात आले आहेत. यातील पहिला बॅरेज हा कळंब तालुक्यातील लासरा शिवारात आहे.
या बॅरेजसची साठवण क्षमता तीन दलघमी असून, पूर्ण क्षमतेने बंधारा भरल्यानंतर यामधून ११.५३ दलघमी पाणी एक्सेस होते. असे असताना येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेला तालुक्यातील १२.७०१ दलघमी क्षमतेचा रायगव्हाण प्रकल्प मात्र सातत्याने तहानलेला असतो.
यामुळेच मांजरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर एक्सेस होणारे पाणी जोडकालव्याच्या माध्यमातून रायगव्हाण प्रकल्पात टाकणाऱ्या योजनेचा विषय पुन्हा अजेंड्यावर आला होता. यासाठी बंद पाईपलाईन पर्याय समोर ठेवत सर्वेक्षणाचे काम नव्याने हाती घेण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणात लासरा ते रायगव्हाण दरम्यान येणाऱ्या गावातील व लगतच्या शिवारातील अस्तित्वातील स्थापित साठवण क्षेत्रात पाणी वळतं करावी, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी मंगळवारी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची समक्ष भेट घेऊन केली होती. तत्पूर्वी यासाठी अधिक्षक अभियंता इलियास चिश्ती यांच्यासमवेत उस्मानाबाद येथे बैठक घेतली होती.