सरकारची काटकसर, पूरक पाेषण आहारात तेलाऐवजी साखर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:44+5:302021-06-02T04:24:44+5:30
सहा महिने ते तीन वर्ष, तीन वर्ष ते सहा वर्ष, गराेदर आणि स्तनदा मातांचे आराेग्य शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त रहावे, बालकांना ...
सहा महिने ते तीन वर्ष, तीन वर्ष ते सहा वर्ष, गराेदर आणि स्तनदा मातांचे आराेग्य शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त रहावे, बालकांना सकस आहार मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा याेजनेअंतर्गत पूरक पाेषण आहार दिला जाताे. मात्र, मागील वर्षांपासून काेराेना संकटाने पाठ साेडली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना काेरडा शिधा दिला जात आहे. यामध्ये गहू, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, हळद, मिरची, तांदूळ आदींचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून खाद्य तेलाच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. १७० रूपये प्रति किलाे पर्यंत खाद्य तेलाचा दर पाेहाेचला आहे. खाद्य तेलाचे भडकलेले दर लक्षात घेऊन शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हे काही दिवस चालेल असे वाटत हाेते. परंतु, मागील चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना खाद्य तेलच मिळाले नाही. त्यामुळे पूरक आहाराला फाेडणी द्यायची कशी, असा प्रश्न आता लाभार्थ्यांना भेडसावू लागला आहे.
चाैकट..
कोरोनामुळे अंगणवाडी गेले दोन वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे पूरक पोषण आहार मुलांना दिला जातो. मात्र मागील तीन-चार महिन्यांपासून तेल देणे बंद करण्यात आले आहे. परिणामी पूरक आहाराला फाेडणी द्यायची कशी, असा प्रश्न आहे.
-तसलिम सरफराज सय्यद ,लोहारा
एक तर हाताला रोजगार नाही. असे असतानाच पूरक पोषण आहारात दिले जाणारे खाद्य तेलही बंद करण्यात आले. सध्या त्याऐवजी साखर दिली जात आहे. हे चुकीचे असून पूर्वीप्रमाणे तेलच देण्यात यावे.
-इरफाना गौस कुरेशी ,लोहारान
पूरक आहारात कडधान्य दिले जाते. साेबतच हळद, तिखट, मीठही असते. फाेडणीसाठी खाद्य तेलही देण्यात येत हाेते. परंतु, तेलाचे दर वाढले म्हणून साखर देणे चुकीचे आहे. फाेडणीच नसेल तर आहार रूचकर कसा हाेईल?
-सुप्रिया गिरीश भगत ,लोहारा