अग्रीमसाठी ‘स्वाभिमानी’ने रोखला महामार्ग, अर्धातास वाहतूक ठप्प
By सूरज पाचपिंडे | Published: September 10, 2023 05:22 PM2023-09-10T17:22:00+5:302023-09-10T17:22:08+5:30
घोषणांनी दणाणला परिसर
नळदुर्ग (जि. धाराशिव ) : तुळजापूर तालुक्यातील जळकोट, नळदुर्ग महसूल मंडळ अग्रीम विम्यात समाविष्ट करण्यात यावे, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे रास्ता रोको केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासन, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील अर्धातास वाहतूक ठप्प होती.
गेल्या दीड महिन्यापासून तुळजापूर तालुक्यात पाऊस पडला नाही, शिवाय जेथे पडला तो सरासरी पेक्षा खूप कमी असतानाही महसूल प्रशासनाने नळदुर्ग, जळकोट, शहापूर परिसरात चांगला पाऊस झाल्याचे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. जळकोट, नळदुर्ग महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा केली.
जळकोट, नळदुर्ग महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम देण्यात यावे, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली होती. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, सरदार सिंग ठाकूर, भास्कर सुरवसे, नानासाहेब पाटील, दिलीप जोशी, दिलीप पाटील, व्यंकट पाटील, बाबू जाधव, धन्यकुमार जाधव यांच्यासह शहापूर, दहिटना, वागदरी, रामतीर्थ, नळदुर्ग, सराटी, अणदुर, खुदावाडी, जळकोट, गुजनुर व गुळहळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.