उस्मानाबादच्या कृषी कार्यालयात 'स्वाभिमानी'ची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:07 PM2020-01-20T15:07:17+5:302020-01-20T15:08:31+5:30
पिकविम्यातून सोयाबीन पिकाला वगळल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
उस्मानाबाद : खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान होऊनही विम्यातुन वगळल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी कृषी उपसंचालक कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली.
मान्सून परतीचा काळ संपल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानुषंगाने राज्यपालांनी त्यावेळी तातडीने मदत जाहीर केली व त्याचे वाटपही सुरू आहे. असे असतानाही पिकविम्यातून सोयाबीन पिकाला वगळल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
यानुषंगाने सोमवारी या पदाधिकाऱ्यांनी कृषी उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. याठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना राग अनावर झालेल्या पदाधिकाऱ्यांनी दालनातील खुर्च्यांची मोडतोड केली. न्याय न मिळाल्यास याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच एकही मंत्री, खासदार, आमदारांस जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नसल्याची भावना या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.