पाच हजार दंड घ्या, पण शौचालयाला पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:26 AM2020-12-25T04:26:01+5:302020-12-25T04:26:01+5:30
इंदापूर : वाशी तालुक्यातील इंदापूर येथे गुरूवारी भल्या पहाटे गुडमॉर्निंग पथक दाखल झाले. मात्र यावेळी ‘साहेब, पाचशे नाही पाच ...
इंदापूर : वाशी तालुक्यातील इंदापूर येथे गुरूवारी भल्या पहाटे गुडमॉर्निंग पथक दाखल झाले. मात्र यावेळी ‘साहेब, पाचशे नाही पाच हजार रुपये दंड घ्या पण शौचालयाला पाणी द्या. मग आम्ही शौचालयाचा वापर करू’, अशी आर्जव केली. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचारीही हातबल झाले. वास्तविक येथील साडेसातशे कुटूंबांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम केले आहे. परंतु, गावात मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पिण्यासोबतच वापरासाठीचे पाणी देखील शेतातून आणावे लागते. असे असताना शौचालयाचा वापर कसा करायचा, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर कसा करणार, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी गावात पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्या १८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी ग्रामस्थांनी पाणीच नाही तर शौचालयाचा वापर कसा करायचा, असा सवाल या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केला. यावेळी गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी महादेव सुद्रीक, ग्रामसेवक उपरवट, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.