तिसऱ्या लाटेत बालकांची विशेष काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:24+5:302021-05-28T04:24:24+5:30
कळंब : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना प्रामुख्याने बाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी ...
कळंब : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना प्रामुख्याने बाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी लहान मुलांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी केले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. ही लाट मागील लाटेपेक्षा भिन्न असून, ती तरुणांना जास्त धोकादायक होताना दिसून येत आहे. पहिल्या ३ ते ४ दिवसात तिची तीव्रता जास्त असून वेळीच औषधोपचार न घेतल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकते व वेळप्रसंगी जीवावर देखील बेतले जाऊ शकते.
या आजाराची लहान मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात आणि क्वचित प्रसंगी रुग्ण गंभीर होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे लहान मुलांमध्ये प्रतिकार शक्ती उत्तम असून, त्यांना सर्दी-पडशाचा प्रादुर्भाव वर्षातून एक-दोन वेळा होत असल्याने ते बऱ्यापैकी रोगप्रतिकार शक्ती बाळगून असतात. यासाठी पालकांनी घाबरून जाऊ नये व आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शक्यतो घरी उपचार करणे, मनाने औषधं देणे टाळावे असेही डॉ. लोंढे यांनी सांगितले.
चौकट -
लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे
ताप, सर्दी, पडसे, नाक चोंदणे, नाक गळणे, कोरडा खोकला, ढास लागणे, खोकल्याची उबळ येणे, धाप किंवा दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ओठ, जीभ, त्वचा, नखे, निळसर पडणे, खुप ताप येणे, भूक मंदावणे, बाळ मलूल होऊन हालचाल कमी होणे, निस्तेज होणे, हात-पाय थंड पडणे, अंगात ताप मुरणे, शुद्ध हरपणे, झटके येणे आदी लक्षणे लहान बालकांत दिसून येतात.
चौकट -
उपचारासाठी केलेल्या उपाययोजना
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांचा समावेशआहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली असून, औषधोपचारांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी जिल्हा समन्वय समितीचे गठन केले गेले आहे. शिवाय, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. पालकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे व वरील लक्षणे दिसून येताच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे., सरकारी व खासगी डॉक्टर्सना साथरोग आजार नियंत्रण अभियानांतर्गत योग्य त्या सूचना दिल्या असून, शासनाच्या विविध दिशा-निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे डॉ. लोंढे यांनी सांगितले.