तालुका क्रीडा संकुल पाच वर्षासाठी रोटरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:51+5:302021-06-09T04:40:51+5:30
कळंब : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शासनाच्या क्रीडा विभागाचे क्रीडा संकुल देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कळंब सिटी रोटरी ...
कळंब : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शासनाच्या क्रीडा विभागाचे क्रीडा संकुल देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कळंब सिटी रोटरी क्लबकडे पाच वर्षासाठी करारावर देण्यात आले आहे. यामुळेतरी या प्रशस्त क्रीडा संकुलाला ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
शहरातील पं. जवाहरलाल नेहरू बालोद्यानच्या पाठीमागील बाजूस क्रीडांगण, इन्डोअर खेळासाठी मोठा हॉल, लॉन टेनिस मैदान, तालुका क्रीडाधिकारी कार्यालय शासनाने सहा वर्षांपूर्वी कोटीच्या घरात खर्च करून बांधले आहे. तेंव्हापासून याठिकाणी ना खेळाडू वावरले ना क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू देणाऱ्या कळंबला हे क्रीडा संकुल मात्र ‘असून अडचण’ असेच ठरत होते. क्रीडा संकुलाच्या खिडक्या, दारे चोरीला गेल्याने या संकुलात ‘रात्रीचे खेळ’ मात्र विनसायास चालत आहेत. जवळपास १० लाख रुपये खर्चून बांधलेले लॉन टेनिसचे तर अख्खे मैदान चोरीला गेले तरी त्याचा क्रीडा विभागाला पत्ता लागला नाही. हे मैदान तयार केल्यानंतर त्यामध्ये संबंधित कंत्राटदाराने खाऊगिरी केल्याची ओरड तेंव्हा झाली होती. त्यामुळे कदाचित ते मैदानच गायब केले असावे, अशी चर्चाही मध्यंतरी होती.
या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी कळंब रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी हे क्रीडा संकुल करार पद्धतीने घेण्याची तयारी दर्शवली होती. खेळ व खेळाडूंचे शहर असलेल्या कळंबमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन तसेच खेळाडूंना स्पर्धाची तयारी करण्यासाठी हे क्रीडा संकुल उपयोगात आणण्याचा प्रस्ताव रोटरीने तालुका क्रीडा संकुल समितीपुढे ठेवला होता.
तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आ. कैलास पाटील यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन कळंब येथील क्रीडा संकुल खेळ व खेळाडूंना उपलब्ध करून देण्याची सूचना क्रीडा विभागाला दिली. यानुसार क्रीडा कार्यालय, रोटरी क्लब व तालुका क्रीडा समितीमध्ये चर्चा होऊन पाच वर्षासाठी कळंबचे क्रीडा संकुल कराराद्वारे रोटरीकडे देखभाल, दुरुस्तीसाठी देण्यात आले.
चौकट -
असा होणार फायदा
कळंब येथील क्रीडा संकुलाची आवश्यक ती डागडुजी करून संपूर्ण क्रीडा संकुल रोटरीकडे पुढील पाच वर्षासाठी करारावर देण्यात आले आहे. याठिकाणी रोटरी स्वतःची यंत्रणा वापरून देखभाल, संरक्षण, दुरुस्ती करणार आहे. खेळाडूंना इनडोअर खेळ, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक, लॉन टेनिस तसेच इतर क्रीडा प्रकार खेळण्यासाठी सुविधाही रोटरी उपलब्ध करून देईल. विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन शहरातील मध्यवर्ती ठिकाणी करता येणार असल्याने ते सर्वांसाठी सोईचे ठरेल. महत्वाचे म्हणजे शासनाने कोटीच्या घरात खर्च करून उभारलेले क्रीडा संकुल वापरात येऊन त्याचा दुरुपयोग टळेल.
क्रीडा विभागाचे लक्ष राहील
क्रीडा विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कळंब येथील क्रीडा संकुल कार्यान्वित झाले नव्हते. कळंब रोटरी क्लबने या क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्तीची तयारी तालुका क्रीडा समितीकडे दर्शविली. क्रीडा संकुलाचे हीत लक्षात घेऊन समितीने रोटरीबरोबर पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी करार केला. त्यामुळे आता क्रीडा संकुल कार्यान्वित होईल व खेळाडूंची चांगली सोय होईल. याठिकाणी क्रीडा विभागाचेही लक्ष राहील. आगामी काळात क्रीडा विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध झाले तर तेही याठिकाणी कार्यरत होतील, अशी माहिती तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके यांनी दिली.