उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला; सिलेंडरचे स्फोट, वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 07:59 PM2020-02-11T19:59:09+5:302020-02-11T22:43:13+5:30
उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर तामलवाडीजवळ गॅस टँकरने पेट घेतल्याने एकामागून एक सिलेंडरचे स्फोट झाले.
उस्मानाबाद : गॅस सिलिंडरची वाहतूक करीत असलेल्या एका कंटेनरला आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६़४० वाजण्याच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील तामलवाडी गावानजिक घडली़ आगीमुळे कंटेनरमधील गॅस सिलिंडरचे एकामागोमाग स्फोट सुरु झाले़ रात्री उशिरापर्यंत ही मालिका सुरुच होती़ दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव तामलवाडी गावातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून, महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़
सोलापूर येथून भरलेले गॅस सिलिंडर भरुन एक कंटेनर मंगळवारी सायंकाळी सोलापूर-धुळे महामार्गावरुन निघाला होता़ दरम्यान, तामलवाडी गावापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असताना या कंटेनरला पाठीमागून आग लागली़ ही माहिती समजल्यानंतर चालकाने संभाव्य धोका लक्षात घेत वाहन जागेवरच थांबविले़ यावेळी आग विझविण्याचे जवळ कोणतेही साधन नसल्याने आग वाढत गेली़ संपूर्ण कंटेनर आगीने वेढल्यानंतर ७ वाजेपासून आतील गॅस सिलिंडरचे स्फोट होऊ लागले़ यामुळे गावातील नागरिक भयभीत होऊन गावाबाहेर धाव सुटले़ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महसूल विभागास याबाबतची माहिती दिली व तुळजापूर, सोलापूर येथून अग्निशमन यंत्रांना पाचारण केले़ तोपर्यंत पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक दूर अंतरावरच थांबविली़ यादरम्यान, गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट सुरुच होते़ या वाहनात सुमारे २०० टाक्या भरलेल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे़ रात्री उशिरापर्यंत या टाक्यांचा स्फोट सुरुच होता़ वाहतूक थांबविल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या़ दरम्यान, तुळजापूरचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी व पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून गावातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गावाबाहेर काढण्याचे काम सुरु केले़ पोलिसांनी गावातून स्पीकरद्वारे तसे आवाहनच सुरु केले होते़ गरजूंना पोलिसांच्या वाहनांतूनच बाहेर नेण्यात येत होते़
घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल झाली असली तरी सातत्याने स्फोट व आगीचे प्रचंड लोळ उठत असल्याने या यंत्रणेलाही आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या़ दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे़ या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही़ दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुसºया बाजूने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले़