सवाष्ण भोजनात पुरणपाेळीचा अस्वाद घेतलेल्या ३० सुवासिनींना विषबाधा
By बाबुराव चव्हाण | Published: February 8, 2024 12:59 PM2024-02-08T12:59:51+5:302024-02-08T13:21:28+5:30
एकूण ३० महिलावर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
कळंब (जि. धाराशिव) - तालुक्यातील परतापूर येथे सवाष्ण भोजनाच्या कार्यक्रमात पुरणपोळीचा आस्वाद घेतलेल्या ३० सुवासिनींना अन्नातून विषबाधा झाली. त्यांच्यावर धाराशिव येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
विविध कुलाचार, कुळधर्म , व्रतवैकल्ये करताना तसेच घरात शुभविवाह कार्य झाल्यावर, शेतातील देवतांची आराधना करण्यासाठी सवाष्ण भोजन कार्यक्रम करण्याची परंपरा आहे. विशेषतः कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात ही प्रथा अधिक जोपासली जाते. तालुक्यातील कळंब बार्शी राज्यमार्गावरील परतापूर या जवळपास सातशे लोकसंख्या व तीनशेच्या आसपास उंबरठा असलेल्या गावातील तानाजी शिवाजी गायकवाड यांच्या कुंटूबाने रविवारी सायंकाळी असाच सवाष्ण भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
यासाठी गावातील आप्तस्वकीयांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. यात पुरणपोळी, आमटी, भात असा प्रचलित मेन्यू होता. या भोजनाचा निमंत्रित असलेल्या अनेक महिला सुवासिनींने आस्वाद घेतला. मात्र, रात्री यापैकी काही महिलांना अस्वस्थ वाटू लागले. उलटी, मळमळ असा त्रास होवू लागला. यानंतर एकमेकींना विचारपूस सुरू झाली. त्रास वाढल्यानंतर मात्र दवाखान्याची वाट धरण्यात आली.
पीएचसी टू सिव्हील, ऑल स्टेबल
सवाष्ण भोजनाच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर त्रास सुरू होत असणारांची संख्या वाढू लागली. त्यानंतर मंगळवारी रात्रीनंतर सर्व रूग्णांना एकत्रीत येरमाळा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. तेथे पाच महिलांना अधिकचा त्रास होवू लागला . यामुळे बुधवारी सकाळी सर्वच महिलांना धाराशीव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तेथे एकूण ३० महिलावर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
प्रत्येकीला वाटले हा त्रास आपल्यालाच...
रविवारी रात्री सवाष्ण भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर एकेका महिलेला त्रास होवू लागला . मात्र, याची व्याप्ती माहिती नसल्याने जसा त्रास होईल तसे प्रत्येकाने आपआपले फॅमिली डॉक्टर गाठले. यामुळे सोमवार , मंगळवारपर्यंत याची व्याप्ती लक्षात आली नाही. शिवाय कारण पण लक्षात आले नाही. याची चर्चा झाल्यानंतर परत बुधवारी सर्वांवर एकत्रीत उपचार सुरू झाले .