तीन महिन्यानंतर तहसीलदार रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:13+5:302021-02-05T08:12:13+5:30
लोहारा : अगोदरच तहसीलदारपद रिक्त. त्यातच तीनपैकी एक नायब तहसीलदार सुटीवर तर दुसरे प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे येथील तहसील कार्यालयाचे कामकाज ...
लोहारा : अगोदरच तहसीलदारपद रिक्त. त्यातच तीनपैकी एक नायब तहसीलदार सुटीवर तर दुसरे प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे येथील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले होते. अखेर तब्बल तीन महिन्यांनी येथे कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले असून, यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
लोहारा तालुका हा ४७ गावांचा असून तालुकास्तरांवरील कार्यालयातील प्रमुख पदे रिक्त झाल्यानंतर ती वेळेत भरली जात नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. असे असतानाच तालुक्याचे प्रमुख पद असलेले तहसीलदार विजय अवधाने यांची ऑक्टोबर २०२० मध्ये नांदेड येथे बदली झाली. यानंतर येथील अतिरिक्त पदभार उमरग्याचे नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे यांच्याकडे देण्यात आला. लोहारा तहसीलदार तीन नायब तहसीलदार पदे मंजूर असली तरी यातील पंकज मदाडे हे प्रतिनियुक्तीवर उस्मानाबादला आहेत. दुसरे नायब तहसीलदार रणजित शिराळकर हे रजेवर. यामुळे प्रभारी तहसीलदार काळे व नायब तहसीलदार डी. पी. स्वामी यांच्यावरच तहसीलचार कारभार सुरू होता. त्यात उमरग्याचे नायब तहसीलदार काळे यांच्याकडे प्रभारी तहसीलदारांचा पदभार असल्याने त्यांना उमरग्यातील मूळ कामकाज पाहत वेळ काढून लोहारा तहसील कार्यालयांचे कामकाज बघावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
अधिकारी नसल्याने नागरिकांचे विविध प्रमाणपत्राचे काम प्रलंबित आहेत. यासंदर्भात लोकमतने ७ नोव्हेंबर २०२० रोजीच्या अंकात ‘तहसीलदारांचे पद रिक्त, एक नायब तहसीलदार सुटीवर, दुसरे प्रतिनियुक्तीवर तर तिसरे आजारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नोव्हेंबर २०२० मध्ये तहसीलदार संतोष रुईकर यांची लोहारा येथे बदली केली. या आदेशात तात्काळ रुजू व्हावे, असे म्हटले होते. परंतु, आदेश निघाल्यानंतर दोन महिन्यांनी २९ जानेवारी रोजी शुक्रवारी तहसीलदार संतोष रुईकर यांनी पदभार स्वीकारला आहे. यामुळे आता लोहाऱ्यांला पूर्णवेळ तहसीलदार मिळाल्याने तीन महिन्यांपासून फाईलीवर साठलेली धूळ आता निघणार आहे.