तुळजाभवानी मंदिर परिसरातील उपदेवी, देवतांची मंदिरेही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 07:34 PM2021-08-07T19:34:07+5:302021-08-07T19:38:54+5:30
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात असलेले अन्नपूर्णादेवी मंदिर, टोळभैरव मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती (मातंगीदेवी) मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले होते.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी प्रशासनाने नियम अटी लादून बंद केले असून, ते अद्यापही बंदच आहे. मात्र, भाविक मंदिर परिसरात असलेल्या उपदेवी देवतांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. यातून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी गुरुवारपासून महाराष्ट्र शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सदरील तिन्ही उपदेवी-देवतांची मंदिरे भाविकांसाठी बंद केली असून, त्याच्या चाव्या मंदिर प्रशासनाकडे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. त्यामुळे भाविक तुळजाभवानी देवीच्या महाद्वारावरच माथा टेकून दर्शन घेतात. मात्र, श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात असलेले अन्नपूर्णादेवी मंदिर, टोळभैरव मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती (मातंगीदेवी) मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले होते. तोंडी सूचना देऊनही मंदिरांत भाविकांची गर्दी होऊन लागल्याने, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होऊन मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता होती. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी भाविकांसाठी मंदिरे कुलूपबंद केली आहेत. त्याच्या चाव्या मंदिर प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या असून, दैनंदिन कुलधर्म कुलाचारासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या पाळीकर पुजारी व सेवेकरी यांची मंदिरातील रजिस्टरला नोंद घेऊन चावी सेक्युरिटीसोबत देऊन मंदिर उघडून पूजा-आरती करून पुन्हा मंदिर बंद करण्यात येत आहे.
पुजारी, व्यापाऱ्यांना दरमहा मदत द्यावी
एक पाळीकर पुजारी व एक सेवेकरी यांना मंदिरात प्रवेश देण्यात येत असून, मंदिरातील पूजा-आरती होईपर्यंत मंदिराची चावी देण्यात येते. पूजा-आरती झाल्यानंतर पुन्हा मंदिराला कुलूप लावून चावी मंदिर प्रशासन कार्यालयात जमा करावी लागते. या मंदिरावर शेकडो कुटुंबांची उपजीविका चालते. मंदिर बंद असल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिर बंद ठेवायचे असेल तर येथील पुजारी, व्यापारी यांना महिन्याकाठी मदत देण्यात यावी, अशी मागणी आदिमाया आदिशक्ती (मातंगी देवी) पाळीकर पुजारी यांनी केली आहे.
कोरोना नियमांचे पालन गरजेचे
कोरोना अजूनही पूर्णत: आटोक्यात नाही. महाराष्ट्र शासनाने जे नियम दिलेले आहेत, त्याचे पालन गरजेचे आहे. बंद केलेल्या मंदिरातील कुलधर्म, कुलाचार सुरू राहतील. धार्मिक विधीसाठी कुठलीही अडचण नाही. मात्र, तेथे भाविक येऊ लागल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता होती. त्याअनुषंगाने तीन मंदिरे सील केली असून, पुजाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- सौदागर तांदळे, तहसीलदार