‘तेरणा’ झाले ओव्हरफ्लो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:46 PM2020-09-21T18:46:03+5:302020-09-21T18:48:49+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांपैैकी एक असलेला तेरणा मध्यम प्रकल्प सोमवार दि. २१ रोजी तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला़ आहे.
उस्मानाबाद : एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांपैैकी एक असलेला तेरणा मध्यम प्रकल्प सोमवार दि. २१ रोजी पहाटेपासून ओसंडून वाहत होता. तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला़ आहे.
दमदार पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पातील पाण्याची आवक चांगलीच वाढली़ आहे. विशेषत: मागील चार दिवसातच पाण्याचा साठा वेगाने वाढला़. त्यामुळे सोमवारी पहाटे प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरुवात झाली़. प्रकल्पाची एकूण क्षमता १९६६३ दलघमी इतकी असून सध्या या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा आहे़. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्यातून बंद पाईपलाईनद्वारे सुमारे २ हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करता येणे आता शक्य झाले आहे़.
शिवाय या प्रकल्पातूनच उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा होत असल्याने आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला म्हणून उस्मानाबादकर आनंदले आहेत. तसेच तेर, ढोकी, येडशी व तडवळा या मोठ्या गावांनाही आता सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य झाले आहे़. प्रकल्प ओसंडून वाहत असल्याचे समजताच सोमवारी अनेक जणांनी ओसंडून वाहणाऱ्या सांडव्याचे दृश्य आपल्या नजरेत साठवून घेण्याचा आनंद लूटला.