ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:59+5:302021-07-25T04:26:59+5:30
उमरगा : ठाकरे सरकारच्या सर्व योजना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्याच असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कर्जमाफी, कोरोना ...
उमरगा : ठाकरे सरकारच्या सर्व योजना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्याच असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कर्जमाफी, कोरोना काळातील कार्य, परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान, गरजूंसाठी शिवभोजन आदींची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. गावातील किती नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले, याची माहिती संकलित करून जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. उमरगा-लोहारा तालुक्यातील या अभियानाचा समारोप शनिवारी कोराळ येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात युवा सेनेच्या ५१ शाखा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार कोराळ येथे युवा सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमास किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहियोद्दिन सुलतान, शेतकरी सेना तालुकाप्रमुख बलभीम येवते, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, विभागप्रमुख, युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, विभागप्रमुख विलास भगत, प्रदीप मदने, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, उपतालुकाप्रमुख संदीप जगताप, शिवसेना विभागप्रमुख खयूम चाकूरे, प्रवीण गोरे, व्यंकट कवठे, प्रशांत पोचापुरे, किरण दासमे, बाबू शेख, श्याम माडजे, विक्रम दासमे, अशोक पवार, प्रकाश जंगाले, बालाजी सुरवसे महाराज, धनराज गाडेकर, दत्ता दासमे, दगडू जंगाले, दिलीप येडगे, महादेव बिराजदार, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात, शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा सन्मान
आ. ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संपन्न होणारा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मागील दोन वर्षे कोरोना आजारामुळे खंडित झाला आहे. यामुळे गतवर्षी व यंदा गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात, शाळेत जाऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यानुसार शनिवारी कोराळ येथील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.