नव्या कुणबी दाखल्याचा आधार, आथर्डीत ठरल्या पहिल्या सरपंच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 05:45 PM2024-09-18T17:45:59+5:302024-09-18T17:46:35+5:30
सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित
कळंब (जि. धाराशिव) : धाराशिव जिल्ह्यातील आथर्डी येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाच्या रिक्त जागी कुसुम चौधरी यांची निवड जाहीर झाली आहे. त्यांनी अलिकडेच निर्गमित झालेले ''कुणबी'' प्रमाणपत्र उमेदवारी अर्जास संलग्न केले होते. या माध्यमातून मराठा आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रावर सरपंच झालेल्या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच ठरल्या.
आथर्डी (ता. कळंब) येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने तद्नंतर झालेल्या सरपंच निवडीत रतन अशोक सुब्रे यांची निवड झाली होती. सरपंच रतन सुब्रे यांनी मागच्या काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जागा रिक्त झाल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी २ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा तहसील कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या कुसुम काकासाहेब चौधरी यांनी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर झाली. अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रणिता दराडे यांनी काम पाहिले.
नव्यानेच मिळाले होते प्रमाणपत्र
सरपंच बनलेल्या कुसुम चौधरी यांना नुकतेच ''कुणबी'' प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते. त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल करताना हेच कुणबी प्रमाणपत्र व याच्या पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती सादर केली होती. यावरून चौधरी यांची नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला सरपंचपदी निवड झाली आहे.
जरांगे-पाटील यांची घेतली भेट
नूतन सरपंच कुसुम चौधरी, अतुल गायकवाड, चेतन कात्रे, दत्ता तनपुरे, ॲड. अशोक चोंदे, शंकरचंद्र खंडागळे, पंडित देशमुख, नितीन चौधरी यांनी निवड जाहीर झाल्यानंतर जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची फलश्रुती कथन केली व आभारही मानले.