कांदे काढणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला ! तोरंबा शिवारातील घटना
By बाबुराव चव्हाण | Published: January 28, 2024 11:17 PM2024-01-28T23:17:00+5:302024-01-28T23:17:18+5:30
तपासासाठी श्वान पथक दाखल
लोहारा (जि. धाराशिव) : शेतात कांदा काढणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह ज्वारीच्या फडात आढळून आल्याची घटना तालुक्यातील तोरंबा शिवारात रविवारी रात्री उघडकीस आली. ही माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील एक ३५ वर्षीय महीला रविवारी गावातीलच एकाच्या शेतात कांदे काढणीसाठी गेली होती. दुपारी जेवन करण्यासाठी त्या घरी न आल्याने त्यांचे पती जेवनाचा डबा घेवून शेतात गेले. परंतु, कांद्याच्या शेतात पत्नी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य तिघा-चौघांना सोबत घेऊन पत्नीचा शोध सुरु केला.
यावेळी जवळच असलेल्या ज्वारीच्या फडात या महिलेचा मृतदेह त्यांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस धवन, पापुलवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लोहारा ग्रामीण रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. शिवाय पोलिसांनी तपासासाठी श्वान पथकास ही पाचारण केले होते. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनीही रात्री घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लोहरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.