धाराशिव जिल्ह्यातील गावगाड्याचा ठरणार स्वच्छता निर्देशांक !

By बाबुराव चव्हाण | Published: September 30, 2023 06:41 PM2023-09-30T18:41:35+5:302023-09-30T18:43:27+5:30

१२५ गुणांसाठी ‘परीक्षा’ : पहिल्या टप्प्यात ८० गावांचा समावेश...

The cleanliness index of the village cart in Dharashiv district! | धाराशिव जिल्ह्यातील गावगाड्याचा ठरणार स्वच्छता निर्देशांक !

धाराशिव जिल्ह्यातील गावगाड्याचा ठरणार स्वच्छता निर्देशांक !

googlenewsNext

धाराशिव : स्वच्छ भारत मिशन (टप्पा-२) अंतर्गत आता जिल्ह्यातील वाडी, वस्त्या अन् लहान-माेठ्या खेड्यांचा स्वच्छता (घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन) निर्देशांक निश्चित केला जाणार आहे. यासाठी आठ घटकांवर आधारित १२५ गुणांची ‘परीक्षा’ हाेणार आहे. जी ‘प्रॅक्टिकल बेस’ असेल. यासाठी पहिल्या टप्प्यात ८० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील पथके या गावांना भेटी देऊन गुणांकण करतील.

स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घर तिथे स्वच्छतागृह उभारल्यानंतर आता टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून आता जिल्ह्यातील वाडी, वस्त्या, तांडे आणि लहान-माेठ्या खेड्यांचा स्वच्छता निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहे. हा निर्देशांक निश्चित करताना डम्पिंग क्षेत्र, कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, उघड्यावर शाैच, सांडपाणी व्यवस्थापन, सुशोभिकरण, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि लॅंडफिल हे आठ घटक विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी १२५ गुण ठेवण्यात आले आहेत. गावात उपराेक्त आठ घटकांच्या अनुषंगाने झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जि.प. विभाग प्रमुख आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांचे पथक असेल. हे पथक गावात जावून पाहणी करून गुणदान करेल. ज्या गावाला ५० पेक्षा कमी गुण असतील, त्यांचे काम असमाधानकारक असेल.

स्वच्छता इंडिकेटर्सचे आज उद्घाटन...
मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता इंडिकेटर्सचे १ ऑक्टाेबर राेजी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते उद्घाटन हाेणार आहे. याप्रसंगी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ हा श्रमदानाचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.

संनियंत्रण अधिकारी नियुक्त...
स्वच्छता निर्देशांकारिता जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्धमान पाटणकर, संकेत चौधरी हे प्रकल्प समन्वयक म्हणून भूमिका निभावणार आहेत.

९० गुणांना अतिउत्कृष्ट शेरा...
जिल्हा तसेच तालुकास्तरीय पथकांकडून गुणांकन केले जाणार आहेत. ९० गुण घेतल्यास संबंधित गावाला अतिउत्कृष्ट, ७० ते ९० गुण मिळाल्यास उत्कृष्ट, ५० ते ७० गुण प्राप्त झाल्यास चांगले तर ५० पेक्षा कमी गुण मिळाल्यास असमाधानकारक हा शेरा प्रगतीपुस्तकात नाेंदविला जाणार आहे.

पहिल्या टप्प्याचे काम सुरू करणार
ग्रामीण भागातील लहान-माेठ्या गावांचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन निर्देशांक निश्चित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ८० गावे निवडली आहेत. या निर्देशांकाचे उद्घाटन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते आज हाेणार आहे.
-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, धाराशिव.

Web Title: The cleanliness index of the village cart in Dharashiv district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.