आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:23 PM2024-10-30T13:23:57+5:302024-10-30T13:24:50+5:30
राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे.
धाराशिव : अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर मतदारसंघातील घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंड्यात आघाडीतील दोन मित्रपक्षांनी उमेदवार दिले आहेत. अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशीही हा पेच सुटला नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी राज्यमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत दंड थोपटले आहेत.
राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे. येथून उद्धवसेनेने दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच दुसऱ्याच दिवशी माजी आमदार राहुल मोटे यांनी शरद पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी दाखल केली. यावरून दोन्ही मित्रपक्षांत खटके उडाले आहेत. राहुल मोटे यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरला तर रणजित पाटील यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमच्या सभेत या जागेवरील पेच ४ तारखेच्या आत सोडवू, असे सांगितले आहे. तर उद्धवसेनेकडून खा. ओम राजेनिंबाळकर यांनीही याच विधानाचा पुनरुच्चार केला. त्यामुळे ही जागा कोणाकडे राहणार, याविषयीचा सस्पेन्स अजून संपला नाही.
८७ वर्षांचे मधुकरराव आग्रही...
वयाच्या नव्वदीकडे मार्गक्रमण करीत असलेले माजी राज्यमंत्री मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. यामुळे मंगळवारी त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष म्हणून अर्ज केला. पक्षाने सांगितले तरी आता माघार नाही, असे विधान करीत बंडाचे स्पष्ट संकेत देऊ केले आहेत. त्यामुळे येथील लढतीत मोठाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.