धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:48 PM2024-07-22T13:48:58+5:302024-07-22T13:51:38+5:30

थरारक घटनेत पंढरपूर ते शेगाव राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटलेल्या बसचा अपघात टळलला

The front tires of the running bus burst; The driver managed to avoid the accident, 70 passengers escaped unharmed | धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले

धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले

कळंब ( धाराशिव): चालकाने कसबपणास लावत समोरील उजव्या बाजूचे टायर फुटलेल्या बसला खड्ड्यात कोसळण्यापासून वाचवत रस्ता दुभाजकावर चढवत अलगद थांबवत मोठा अपघात टाळलला. आज सकाळी साडेअकरा वाजता  पंढरपूर ते शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील परतापुर गावाजवळील थरारक घटनेत चालक एस. एल. दुभळकर यांच्या प्रसंगावधानाने सत्तरपेक्षा अधिक प्रवाश्यांचे प्राण बालंबाल बचावले. 

याविषयी अधिक वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगाराची जिंतूर ते सोलापूर बस ( क्र. एमएच १४ बी. टी. २२४८) येरमाळा, कळंबमार्गे परतीचा प्रवास करत होती. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. सत्तरपेक्षा जास्त प्रवासी होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पंढरपूर ते शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील परतापुर गावालगत अचानक बसचे समोरील उजव्या बाजूचे टायर फुटले. अनियंत्रित झालेली बस रोडलगतच्या खोलगट भागात कोसळण्याची शक्यता होती. यावेळी प्रसंगावधान राखत चालक एस. एल. दुभळकर यांनी आपले कसबपणाला लावून बसला रस्ता दुभाजकाकडे वळवले. गतीवर नियंत्रण मिळवत चालक दुभळकर यांनी बसला दुभाजकावर अलगद थांबवले. चालकाच्या या कौशल्याने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. 

दरम्यान, बसच्या समोरील बाजूचा खालचा भाग चक्काचूर झाला आहे. यावरून बसमधील चालक-वाहक आणि प्रवासी किती मोठ्या अपघातातून बचावले याचा अंदाज येतो. जिंतूर आगाराचे ५७ वर्षीय चालक एस. एल. दुभळकर यांना एकूण २२ वर्षाचा अनुभव आहे. चालक दुभळकर यांच्यामुळेच सर्व प्रवाशी बालंबाल बचावल्याचे सर्वात प्रथम घटनास्थळी पोहचलेले राष्ट्रवादी प्रवक्ता विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांनी सांगितले.

Web Title: The front tires of the running bus burst; The driver managed to avoid the accident, 70 passengers escaped unharmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.