बसचा फ्युअल इंजेक्शन पंप फुटला अन बसस्थानकात उठले धुराचे लोट
By सूरज पाचपिंडे | Updated: August 19, 2023 18:27 IST2023-08-19T18:25:49+5:302023-08-19T18:27:00+5:30
अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आणला धूर नियंत्रणात

बसचा फ्युअल इंजेक्शन पंप फुटला अन बसस्थानकात उठले धुराचे लोट
धाराशिव : एसटी बसगाडीचा अचानक फ्युअल इंजेक्शन पंप फुटल्याने बसस्थानकात धुराचे लोट पसरले. हा प्रकार धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. बस कर्मचाऱ्यांसह तांत्रिक विभागातील मॅकेनिकने बसमधील अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने धूर नियंत्रणात आणला. अचानक धूर पसरल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली.
धाराशिव आगाराची एम.एच. ४० एन. ९८०३ या क्रमांकाच्या बसने औसा मार्गावरून धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. बसने गेटमध्ये प्रवेश करताच अचानक एफआय पंप फेल झाला. त्यानंतर गाडी रेस होऊन बसमध्ये व बसस्थानक परिसरात धुराचे लोट पसरले. वाहक-चालकाने समयसूचकता दाखवत बसमधील प्रवाशांना ताबडतोब खाली उतरविले. अवघ्या काही क्षणात आगारातील काही मॅकेनिकही धावून आले. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने धुरावर नियंत्रण मिळविले. मात्र, अचानक धुराचे लोट पसरल्याने प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.