उस्मानाबादकरांसाठी खुशखबर; दमदार पावसाने जिल्ह्याचा भूजल स्तर १.६९ मीटरने वाढला
By सूरज पाचपिंडे | Published: October 15, 2022 05:32 PM2022-10-15T17:32:05+5:302022-10-15T17:33:38+5:30
मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल स्तर सरासरी १.६९ मीटरने वाढला आहे.
- सूरज पाचपिंडे
उस्मानाबाद : मागील तीन चार वर्षापासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याची भूजल पातळी १.६९ मीटरने वाढली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात पाऊस कमी प्रमाणात झाला. जुलै महिन्यात सर्वच भागात पाऊस पडत होता. ऑगस्ट महिन्यात अधूनमधून पाऊस पडत राहिला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस पडत आहे. काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, ओढे, नालेही प्रवाहित झाले होते. शिवाय, भूजलाचे पुनर्भरण झाले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भूजल पातळीही वाढ झाली आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल स्तर सरासरी १.६९ मीटरने वाढला आहे. जिल्ह्यात ऊस पिकांसह बागायती व फळ पिकांकरिता काही तालुक्यांमध्ये पाण्याचा अमर्याद उपसा होत असतो. मात्र, तीन वर्षापासून काही तालुक्यांमध्ये झालेला समाधानकारक पाऊस भूजल पातळी वाढीसाठी पाेषक ठरला आहे.
११४ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी
भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दर तीन महिन्यांनी सर्व तालुक्यातील ११४ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेतली जाते. यंदा झालेले पर्जन्यमान व मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. ऑक्टोबर महिन्यात भूजल स्तर २.१८ मीटरने वर आल्याचे समोर आले.
तालुकानिहाय भूजल पातळीत झालेली वाढ
तालुका भूजल पातळीत वाढ
भूम २.५७
कळंब ०.५९
लोहारा १.८१
उमरगा २.०२
उस्मानाबाद १.६६
परंडा २.५०
तुळजापूर १.२३
वाशी १.२१