महामार्ग झाला पण मावेजा नाही; शेतकऱ्यांकडून घोषणाबाजीत रस्त्याचे प्रतीकात्मक लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:12 PM2023-03-02T19:12:53+5:302023-03-02T19:13:06+5:30
शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; घोषणांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
- गणेश कुलकर्णी
धाराशिव: नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गासाठी शेतजमिनीचे भूसंपादन व रीतसर मावेजा न देता केलेल्या रस्ताकामाचे तुळजापूर तालुक्यातील शहापूर शिवारातील चंद्रकांत शिंदे यांच्या शेताजवळ गुरुवारी शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यासाठी अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, परंतु एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाहीत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संयुक्त भूसंपादन मोजणी व फेरसंयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे बाधित क्षेत्र तत्काळ संपादित करुन मावेजा देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या भूसंपादन अधिकारी माने यांची खातेनिहाय चौकशी करून तत्काळ बदली करावी व इतर प्रमुख मागण्यांसाठी वेळाेवेळी पाठपुरावा केला. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तुळजापूर तालुक्यातील शहापूर शिवारात रस्त्याचे प्रतीकात्मक लाेकार्पण केले.
यावेळी उपस्थित शेतकर्यानी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेती आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची..’ अशा जोरदार घोषणा देत आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, या साेहळ्यासाठी अधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले हाेते. परंतु, आंदाेलनस्थळी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, प्रशांत शिवगुंडे, बाळासाहेब लोंढे पाटील, दिलीप पाटील, पंडित पाटील, पंडित निकम, लक्ष्मण निकम, खंडू हलकंबे, काशिनाथ काळे, सुभाष पाटील, रहमान शेख, प्रताप ठाकूर, बालाजी ठाकूर, दयानंद लोहार, तोलू पाटील, बंडू मोरे, आबा मोरे, तुकाराम सुरवसे, नरसिंग निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.