अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:54 AM2022-04-20T11:54:04+5:302022-04-20T11:55:06+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : राज्यातील वीज भारनियमनामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. इंधन, गॅस, खते, कीटकनाशक यांच्या दरात भरमसाठ वाढ होऊन महागाई वाढली आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे हे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच धार्मिक प्रश्न उपस्थित करून एकमेकांवर चिखलफेक केली जात असल्याचा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते. यावेळी ते म्हणाले की, महागाईचे अपयश लपवण्यासाठी भाजप ईडी व धार्मिक प्रश्न उपस्थित करून राज्यात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, तर राज्य सरकारही विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आपला वेळ खर्ची घालत आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यापेक्षा इंधन दरवाढ, वीजप्रश्नी पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला.
पवारांना हे माहिती नाही का?
ऊस हे शेतकऱ्यांना आळशी बनवणारे पीक असल्याचे विधान खा. शरद पवार यांनी केले आहे. त्यावर राजू शेट्टी म्हणाले की, ऊस हे शेतकऱ्यांचे आळशी पीक नाही. ते हमीभाव देणारे खात्रीचे पीक असल्याने शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का, असा सवालही शेट्टी यांनी केला.
कोळसाटंचाई; पैसे लाटायचा बहाणा...
राज्यात सध्या कोळसाटंचाई असल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे कोळशाची टंचाई दाखवायची अन् दुसरीकडे बेसुमार भावाने वीज खरेदी करून पैसे लाटायचे, यासाठी हा खटाटोप आहे. वीज खरेदी करण्यापेक्षा कोळसाच का खरेदी करीत नाही, असा आरोपही शेट्टी राज्य सरकारवर केला.