गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार
By चेतनकुमार धनुरे | Published: March 16, 2023 06:20 PM2023-03-16T18:20:01+5:302023-03-16T18:22:52+5:30
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाभरातील पोलिसांना सोबत घेऊन वृक्षराजी फुलविण्याचा चंग बांधला आहे.
धाराशिव : पोलीस म्हटले की रुक्ष अन् कठोर वर्दीधारी सामान्यांच्या नजरेसमोर येतो. कामाच्या ताणातून संवेदना संपलेला माणूस दिसतो. मात्र, या संवेदना पुन्हा जागवून गुन्हेगारांवर चालणारे हात धाराशिवमध्ये मातीत राबताना दिसत आहेत. पोलीस ठाण्याचे आवार फुलविताना आजूबाजूची माळरानेही जंगलांनी समृद्ध करण्यासाठी पोलिसांनी आता पुढाकार घेतला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाभरातील पोलिसांना सोबत घेऊन वृक्षराजी फुलविण्याचा चंग बांधला आहे. आधी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या रिकाम्या आवारात वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण केली. पोलीस मुख्यालयाच्या विस्तीर्ण पडीक जागेची स्वच्छता करून घेत येथेही मियावाकी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. लावलेले प्रत्येक झाड जगलेच पाहिजे, अशा सूचना देत अधिकाऱ्यांना त्यांची नियमित देखभाल करण्यास सांगितले.
इतक्यावरच न थांबता आता त्यांनी जेथे मोकळी माळराने दिसतील तिथे जंगल उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येडेश्वरी देवी मंदिराच्या परिसरातील उजाड माळावर केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने भूम तालुक्यातील हाडोंग्री येथील माळही असाच विकसित करण्यासाठी कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. येथील शिवमंदिर ध्यान केंद्राच्या परिसरात आदित्य बाळासाहेब पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी राबून मोठी वृक्षलागवड केली आहे. ऑगस्ट महिन्यात लावलेली झाडे चांगल्या संगोपनामुळे आता बहरात असून, लवकरच येथे घनदाट अरण्यवजा परिसर फुललेला पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात आणखीही काही ठिकाणी वृक्षप्रेमी, सामान्य जनतेला सोबत घेऊन माळरानांचा असाच कायापालट करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले.