रक्षाबंधनाच्या ओवाळणीत बहिणींना मिळाला रस्ता; उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची कार्यतत्परता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 01:16 PM2022-08-12T13:16:26+5:302022-08-12T13:20:01+5:30
पारगाव-हातोला-पांगरी या तिन्ही गावांसाठीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली हाेती.
- राहुल डाेके
पारगाव (जि. उस्मानाबाद) : वेळाेवेळी पाठपुरावा करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने वाशी तालुक्यातील हाताेला, जेबा, पांगरी, ब्राह्मगावच्या महिलांनी रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना राखी बांधून ओवाळणीत रस्त्याची मागणी करण्याचा निर्धार केला हाेता. त्यावर जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनीही तत्परतेने राखी मिळण्यापूर्वीच या भगिनींना ओवाळणीत रस्ता मंजुरीचे पत्र दिले. भाऊरायाने दिलेल्या या अनाेख्या भेटीने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पारगाव-हातोला-पांगरी या तिन्ही गावांसाठीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली हाेती. प्रवास करणे कठीण झाले हाेते. सततच्या अपघातांमुळे काहींना जीव गमवावा लागला, तर काहींना जायबंदी व्हावे लागले. रस्त्याची डागडुजी व्हावी, यासाठी तिन्ही गावांकडून पाठपुरावा केला जात हाेता.
‘लाेकमत’चा पाठपुरावा...
खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाेणारे बेहाल सर्वप्रथम ‘लाेकमत’ने मांडले हाेते. यानंतरही पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यावर ग्रामस्थांसह महिलांची बैठक हाेऊन रक्षाबंधन दिनी जिल्हाधिकारी यांना राख्या पाठवून ओवाळणीत रस्ता मंजुरीचे पत्र मागण्याचा निर्धार केला हाेता.
अनोख्या भेटीने महिलांना आनंद
प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी खड्डेमय रस्त्यामुळे हैराण झालेल्या चारही गावांतील भगिनींना राखी मिळण्यापूर्वीच ओवाळणीत ९०० मीटर रस्ता मंजुरीचे पत्र दिले. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी १ कोटी २० लाख रुपये प्रस्तावित केले. जिल्हाधिकारी भाऊरायाने दिलेल्या या भेटीने महिलांना आनंद झाला.