स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:10 PM2024-11-01T18:10:00+5:302024-11-01T18:10:28+5:30

अनर्थ टळला : वाहक, चालकासह प्रवासी बालंबाल बचावले

The steering jammed and the bus climbed over the bank of the bridge over the Terna river | स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

तेर : तीव्र वळण रस्त्यावर अचानक स्टेअरिंग जॅम झाल्याने प्रवासी घेऊन जाणारी बस तेरणा नदीपात्रावरील पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने बस नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली. नशीब बलवत्तर म्हणून वाहक, चालकासह आतील पाच ते सहा प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील तेरनजीक घडली.

कळंब आगाराची साेलापूर-कळंब ही बस (एमएच.१४-बीटी.१६३९) बुधवारी रात्री तेर येथे मुक्कामी हाेती. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बस धाराशिव मार्गे साेलापूर येथे गेली हाेती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही बस पुन्हा साेलापूरहून तेर येथे पाेहाेचली. येथे प्रवासी साेडल्यानंतर ही बस कळंबच्या दिशेने रवाना झाली. ही बस तेर गावानजीक असलेल्या धरणाजवळ तेरणा नदीच्या पात्रावरील पुलावर आली असता, अचानक स्टेअरिंग जॅम झाले. परिणामी, ही बस पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखले व पाठीमागील चाक कठड्यात अडकल्यामुळे बस नदीपात्रामध्ये काेसळता-काेसळता वाचली. या बसमधून वाहक, चालक व पाच ते सहा प्रवासी प्रवास करीत हाेते. यांचे नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचेच प्रमाण वाचले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बसची अवस्था पाहून उपस्थितांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महामंडळाने किमान बसेसची अवस्था तरी सुधारावी, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली.

तुळजापुरातच बस झाली खराब...
साेलापूरहून येत असतानाच तुळजापूर येथे साेलापूर-कळंब ही बस खराब झाली हाेती. त्यामुळे तुळजापूर आगारात बस बदली करण्यात आली. ही बस कशीबशी तेर येथे पाेहाेचली. मात्र, धरणानजीक असलेल्या तेरणा नदीवरील पुलावर आल्यानंतर बसचे स्टेअरिंग अचानक जॅम झाले. त्यामुळे ही बस थेट पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने माेठा अनर्थ टळला.

बसमध्ये हाेते पाच प्रवासी...
साेलापूर-कळंब या बसने तेर येथे काही प्रवासी साेडले. यानंतर ही बस जवळपास पाचजणांना घेऊन कळंबच्या दिशेने निघाली हाेती. वाहक, चालकासह सातजण आत हाेते. हीच बस तेरणा नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली.

बसची अवस्थाही बिकटच...
तुळजापूर येथे बदली करून घेतलेल्या बसची अवस्थाही फार काही चांगली नव्हती. खिडक्यांच्या काचा खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पत्रा उचकटलेला आहे. याच बसचे स्टेअरिंग जॅम झाल्याने दुर्घटना घडली.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची नाही का?
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलतीच्या येाजना आणल्या आहेत. मात्र, दुसरीकडे बहुतांशी बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जीव मुठीत धरून लाेकांना प्रवास करावा लागत आहे. अनेक बसेस वापराबाहेर गेल्या आहेत. तरीही दामटल्या जात आहेत. परिणामी, अपघाती घटनांमध्ये माेठी वाढ झाली आहे. असे असतानाही महामंडळाकडून मात्र उपाययाेजना हाेताना दिसत नाहीत. महामंडळाला लाेकांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही का, असा सवाल प्रवासी सहदेव कावळे यांनी उपस्थित केला.

Web Title: The steering jammed and the bus climbed over the bank of the bridge over the Terna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.