सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:25 AM2022-04-12T11:25:28+5:302022-04-12T11:26:30+5:30
महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला.
कळंब (जि.उस्मानाबाद) : कसायला घेतलेल्या फडात सालभर जोपासलेले ''कष्ट'' कोयता लागत नसल्याने तसेच निपचीत पडलेले होते. यातच पंधरा महिने झालेल्या या उसावर महावितरणच्या शॉर्टसर्किटचा ''कोप'' झाला. या वणव्यात कुटुंबाचा आधार असलेली ६५ वर्षीय महिला शेतकरी खचली अन् सोमवारी तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सौंदणा येथे घडली आहे.
मांजरा तीरावरील सौंदणा गावात प्रकल्प भरला की शिवार अन् मन खुललेले आणि फुललेले असते. गाळप हंगाम सुरू झाला की उसाच्या गोडव्याचा दरवळ प्रफुल्लित करतो. यंदा मात्र शेतकरी अतिरिक्त उसाच्या संकटाने हतबल झाले आहेत. सौंदण्याच्या पाचपिंडे कुटुंबाची काही वेगळी अवस्था नव्हती. बालाजी, विनायक अन् दत्ता हे तिघे भाऊ. जमीन जेमतेम दोन एकर. यात भागत नसल्याने शेजारच्या चुलत्यांची जमीन कसायला घेत ऊस लावला अन् सालभर कष्ट उपसत पिकवला. मात्र, तोड मिळत नसल्याने त्यांची मागच्या तीन महिन्यांपासून फरपट सुरू होती. हे कमी म्हणून की काय महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हताश झाले. यात या पाचपिंडे बांधावांची शेतकरी आई अंजनाबाई याही अस्वस्थ झाल्या. रविवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लागलीच अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवले. मात्र, हृदयविकाराचा धक्का तीव्र स्वरूपाचा असल्याने सोमवारी सकाळी अंजनाबाई पाचपिंडे यांनी अखेरचा श्वास घेतला.
कारखाने ढुंकूनही पाहेनात...
७ एप्रिल रोजी दत्ता पाचपिंडे यांचा ऊस जळाला. यानंतर तीन दिवसांनी या धक्क्यातून न सावरलेल्या त्यांच्या आई अंजनाबाई यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असले तरी तीन दिवसांपासून फडात जळून निपचीत पडलेला ऊस घेण्यास कोण्या कारखान्यांची यंत्रणा आलेली नव्हती. यावर खेद व्यक्त होत आहे.