नान्नजवाडी सरपंचाच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:29+5:302021-06-30T04:21:29+5:30
पाथरुड : भूम तालुक्यातील नान्नजवाडी येथे विद्यमान सरपंच धनजंय इंद्रजित काटे यांच्या गेट व घराचे कुलूप तोडून ...
पाथरुड : भूम तालुक्यातील नान्नजवाडी येथे विद्यमान सरपंच धनजंय इंद्रजित काटे यांच्या गेट व घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे पावणेदोन वाचण्याच्यासुमारास चोरी करून रोख १५ हजार रुपये व एक सोन्याची नथ लंपास केली.
भूम तालुक्यातील नान्नजवाडी येथील विद्यमान सरपंच धनजंय इंद्रजित काटे यांचे घर गावातील मुख्य रस्त्यावर असून, घराला चारही बाजूंनी संरक्षक भिंत आहे. दररोजप्रमाणे सरपंच काटे हे बाहेरील लोखंडी गेटचे कुलूप लावून एका खोलीचेही कुलूप लावून दुसऱ्या खोलीमध्ये आपल्या कुटुंबासह झोपले होते. मंगळवारी पहाटे पावणेदोनच्यासुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी प्रथम सरपंच काटे यांच्या गेटचे व एका खोलीचे कुलूप तोडून एका चोरट्याने घरात प्रवेश केला व एक चोरटा बाहेर दुचाकीवर अंधार असलेल्या बाजूला दबा धरुन बसला होता. यावेळी शेजारील एक व्यक्तीला काहीतरी आवाज आल्याने त्यांनी बाहेर डोकावले. यावेळी त्यांना बाहेर एक व्यक्ती दिसल्याने त्यांनी विचारणा केली. यावर संबंधित चोरट्याने त्यांच्या दिशेने हातातील कुलूप फेकून मारले. यावेळी जागे झालेल्या व्यक्तीने आरडाओरड केल्याने घरातील दुसरा चोरटा पळत घराबाहेर येऊन बाहेर थांबलेल्या चोरट्यासोबत दुचाकीवरून पसार झाला. यावेळी चोरट्याने सरपंच काटे यांच्या घरातील रोख १५ हजार रुपये व एक सोन्याची नथ लंपास केली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत भूम पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही वाहने चोरीस जाण्याच्या अनेक घटना घडल्या असून, त्याचा तपास अजूनही लागलेला नाही. पाथरुडपाठोपाठ आता ग्रामीण भागातही चोरटे सक्रिय झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.