तारण ठेवलेली ४६ कोटींची साखर चोरली; तीन बँक अधिकारी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:31 AM2022-03-26T11:31:56+5:302022-03-26T11:35:05+5:30
कळंब तालुक्यातील हावरगाव येथे असलेल्या तत्कालीन शंभू महादेव साखर कारखान्यास परळी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून साखर गहाण ठेवून घेत जवळपास ४६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते.
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील हावरगाव येथील कारखान्यास साखर गहाण ठेवून ४६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही साखर परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तीन बँक अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली.
कळंब तालुक्यातील हावरगाव येथे असलेल्या तत्कालीन शंभू महादेव साखर कारखान्यास परळी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून साखर गहाण ठेवून घेत जवळपास ४६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. त्यामुळे कारखान्याकडील साखर ही परळी बँकेच्या ताब्यात होती. मात्र, २०१७-१८ साली ही साखर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. साखर कारखान्याचे पदाधिकारी व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा ठपका ठेवत चेअरमन दिलीप आपेटसह जवळपास ४० जणांविरुद्ध याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
उपाधीक्षक अंजुम शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आपेट याच्यासह सहाजणांना यापूर्वीच अटक झालेली आहे. दरम्यान, तपास सुरू असताना या गुन्ह्यात सहभाग आढळून आलेल्या आणखी तीन बँक अधिकाऱ्यांना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली आहे. यामध्ये परळी बँकेचे संपत साबळे, रोहिदास घोडके व अन्य एका बँकेचे नीलेश देशपांडे यांचा समावेश आहे. त्यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने या तिघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.